कोळशेवाडी पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना अटक करण्यात यश आलं आहे. राजेश राजभर, राहुल घाडगे अशी दोन चोरट्यांची नावे आहेत. राजेश राजभर विरोधात बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, वसई, विरार, मुंबई, पुणे येथील विथ पोलीस ठाण्यात 30 घरफोडीचे गुन्हे दाखल झाले आहेत. राजेशा घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरायचा आणि हे दागिने त्याच्या परिवारातील सदस्यांच्या मदतीने सोनारांना विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी त्याचे वडील भाऊ आणि वहिणींना देखील आरोपी घोषित केले आहे. तर घरफोडीच्या दुसऱ्या आरोपीला अटक करण्यात आलेला राहुल घाडगे यांच्या विरोधात देखील कोळशेवाडी पोलीस ठाण्यात पाच घरपोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दोघांकडून पोलिसांनी तब्बल 12 लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
कल्याण पूर्व परिसरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश नायदे, पोलीस अधिकारी दिनकर पगारे, पोलीस अधिकारी मदने, सुशील हांडे, सुरेश जाधव, सचिन कदम यांच्या पथकाने तपास सुरू केला. खबऱ्यांनी दिलेली माहिती आणि सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची ओळख पटवून या चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी सापळा रचला. विठ्ठलवाडी बस डेपोजवळ रचलेला सापळ्यात सराईत चोरटा राहुल घाडगे याला पकडण्यात पोलिसांना यश आलं.
पोलिसांना बघून राहुल गाडगे पळून जात होता मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलं. राहुल गाडगे विरोधात कोळशेवाडी पोलीस ठाण्यातच तब्बल पाच घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून पोलिसांनी दोन लाख दहा हजारांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. याच दरम्यान कोळशेवाडी पोलिसांना घरफोडी करण्यात सराईत असलेला राजेश राजभर हा उत्तर प्रदेश येथे आपल्या गावी लपून बसल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी उत्तर प्रदेश आजमगड येथील लालगंज परिसरात वेशांतर करून सापळा रचला व त्या ठिकाणाहून राजेश राजभर याला बेड्या ठोकल्या आहेत. राजेश राजभर विरोधात याआधी देखील बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, वसई, विरार, मुंबई, पुणे येथील विविध पोलीस ठाण्यात एकूण 30 गुन्हे दाखल आहेत. कोळशेवाडी पोलिसांनी आतापर्यंत त्याच्याकडून चार गुन्ह्यांची उकल करत दहा लाखांचे दागिने हस्तगत केले आहेत. तपासा दरम्यान धक्कादायक बाब समोर आले की राजेश चोरी केलेले दागिने त्याच्या परिवारातील त्याचे वडील भाऊ व वहिनी यांच्या मार्फत सोनारांना विक्री करत होता व आलेल्या पैशातून त्याचे कुटुंब उपजीविका करत होते.