कुडाळ : राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अजूनही मुसळधार पाऊस कोसळत आहे, मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याचसंदर्भात पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना आंबिया बहार सन २०२३-२४ करिता विमा नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना गणेश चतुर्थीपूर्वी मिळावी अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे. यावर कृषिमंत्री मुंडे यांनी कृषी विभागाचे मुख्य सचिव यांना सदर बाबतीत प्रस्ताव सादर करावा असे आदेश दिले आहेत, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.
कृषीमंत्र्यांना दिलेल्या पत्रात आमदार वैभव नाईक यांनी म्हटले आहे की, पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना आंबिया बहार सन २०२३-२४ करिता सिंधुदुर्ग जिल्हयातील ४२,१९० आंबा काजू बागायतदार शेतकऱ्यांनी फळपिक विमा योजनेत सहभाग घेऊन १९.९११.०० हेक्टर क्षेत्र संरक्षित केले आहे. १८ जून २०२१ रोजीच्या शासन निर्णयामध्ये हवामान धोका संपल्यानंतर आणि राज्य आणि केंद्र शासनाकडील विमा हिस्सा रक्कम विमा कंपनीला प्राप्त झाल्यानंतरच तीन आठवडयात विमा नुकसान भरपाई वितरणाची कार्यवाही विमा कंपनीकडून करण्यात येते. अशी शासन निर्णयामध्ये तरतुद आहे.
गतवर्षी म्हणजेच सन २०२२-२३ ची विमा नुकसान भरपाई नोव्हेंबर, २०२३ अखेर विमा कंपनीकडून वितरीत करण्यात आली होती. त्यामुळे यावर्षी गणेश चतुर्थी अगोदर सन २०२३-२४ ची नुकसान भरपाई सिंधुदुर्ग जिल्हयातील पात्र बागायतदार शेतक-यांना विमा कंपनीकडून मिळणेबाबत कार्यवाही व्हावी अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.