
कृष्णराज महाडिकांची अवघ्या २४ तासांतच निवडणुकीतून माघार
Maharashtra Breaking LIVE News Today: महाराष्ट्रासह देशविदेशातील ब्रेकिंग बातम्यांच्या लाईव्ह अपडे्स एका क्लिकवर
महायुतीच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्यापूर्वीच कृष्णराज महाडिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे शिवसेना शिंदे गटासह भाजपातील अनेक स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रचारात सहभागी न होण्याचा ठाम निर्णय घेतला होता. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आधीच उमेदवारीवरून रस्सीखेच, स्थानिक नेत्यांचे गट-तट आणि पक्षांतर्गत असंतोष उफाळून आलेला आहे. त्यातच कृष्णराज महाडिक यांच्या उमेदवारीने अनेक इच्छुकांचे राजकीय गणित बिघडले. विशेषतः शिवसेना शिंदे गटातील काही नेते आणि भाजपातील स्थानिक पदाधिकारी यांना ही उमेदवारी मान्य नसल्याचे उघडपणे जाहीर करून नाराजी व्यक्त केली. (Kolhapur Muicipal Election)
खासदार धनंजय महाडिक यांनी परिस्थितीची गंभीरता ओळखून पुत्र कृष्णराज यांना निवडणुकीतून माघार घेण्याची सूचना केली. महायुतीत उघडपणे फूट पडल्याचा संदेश मतदारांपर्यंत जाऊ नये, तसेच पक्षाचे एकूण नुकसान टाळावे, या उद्देशानेच हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
कृष्णराज महाडिक यांनी मात्र अधिकृतपणे वेगळी भूमिका मांडली आहे. पक्षातील निष्ठावंत व जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी, या भावनेतून मी निवडणुकीतून माघार घेत आहे. हा निर्णय पूर्णपणे माझा असून, पक्ष आणि संघटनेच्या हितासाठीच घेतला आहे, असे त्यानी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तथापि, त्यांच्या या स्पष्टीकरणाकडे राजकीय वर्तुळात साशंकतेने पाहिले जात आहे.
शनिवारी झालेल्या भव्य शक्तिप्रदर्शनानंतर अवघ्या एका दिवसात माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. जर माधारच घ्यायची होती, तर इतके मोठे शक्तिप्रदर्शन का, असा सवाल कार्यकर्त्यांमधूनच उपस्थित होत आहे. यामुळे महायुतीतील समन्वयाचा अभाव, अंतर्गत संवादातील दरी आणि स्थानिक पातळीवरील असंतोष पुन्हा एकदा चव्हाटचावर आला आहे. (local body Election 2026)
एकीकडे ‘निष्ठावंत कार्यकत्यांना संधी हा अधिकृत दावा, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गट व भाजपातील नेत्यांचा प्रचार न करण्याचा निर्णय आणि धनंजय महाडिक यांची माघारीची सूचना -या साऱ्या घटनांमुळे कोल्हापूरच्या राजकारणातील गुंतागुंत अधोरेखित झाली आहे. आगामी काळात या माघारीचा महायुतीव्या एकूण कामगिरीवर काय परिणाम होतो आणि अंतर्गत वाद कितपत मिटतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.