अक्कलकोट: श्री तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथे स्वामी समर्थ महाराज यांचा प्रगटदिन मोठ्या भक्ती भावात लाखो भाविकांची उपस्थितीत साजरा करण्यात आला. स्वामी भक्तांच्या प्रचंड गर्दीने अक्कलकोटनगरी फुलली होती. स्वामी नामाच्या जयघोषाने सारा आसमंत दुमदुमून गेला. वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर, बुधवार पेठ समाधी मठ, स्टेशन रस्ता राजेराय मठ, गुरुमंदिर राम गल्ली, बॅगेहिळळी स्वामी समर्थ विश्रांती धाम येथे प्रगट दिननिमित्त भाविकांनी स्वामीचे दर्शन घेतले.
स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिनानिमित्त रविवारी रात्रीपासून महाराष्ट्रातील अनेक भागातून पायी पालखी दिंडी सोहळे व स्वामी भक्त अक्कलकोट तीर्थक्षेत्री दाखल झाले होते. सोमवारपर्यंत हा ओघ चालूच होता. स्वामी दर्शनासाठी रविवारी मध्यरात्रीपासून स्वामी भक्त स्वामी दर्शनासाठी गुरुमंदिर रस्ता, राजेफत्तेसिह चौक, गायत्री हॉटेल, स्वामी मंदिर, दक्षिण महाद्वारपर्यंत लांबच लांब रांग लागली होती. सोमवारी दिवसभर भाविकाची दर्शन रांग वाढतच गेली. पहाटे ५ वा काकड अारती झाली. नगरप्रदक्षिणेत राजेराय मठाचे विश्वस्त विकास दोडके, अक्षय सरदेशमुख, बाळासाहेब घाटगे, चन्नविर फुलारी, प्रदीप हिंडोळे, पुणे येथील स्वामी भक्त नरेश अहिर, अखिलेश नायकु, विशाल पाठक, काशिनाथ इंडे यांच्यासह स्वामी भक्त सहभागी झाले हाेते.
दिगंबराच्या जयघोषात नगर प्रदक्षिणा
स्वामी महाराज मंदिर येथून पहाटे ४ वाजता दिंगबरा दिंगबरा, श्रीपाद वल्लभ दिगबराच्या जयघोषात हजारो स्वामी भक्ताच्या उपस्थितीत नगर प्रदक्षिणा निघाली. वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरातून फत्तेसिंह चौक, समर्थ चौक, वीर सावरकर चौक, कापड बाजार, कारंजा चौक, बुधवार पेठ, समाधी मठपर्यंत मार्गस्थ झाली. समाधी मठापासून सुभाष गल्ली, जयजवान गल्ली, राम गल्ली, भारत गल्ली, देशमुख गल्ली मार्गे वटवृक्ष मंदिरापर्यंत पुन्हा नगर प्रदक्षिणा मार्गस्थ झाली.
स्वामी प्रकटदिन पाळणा कार्यक्रम
वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरात स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन कार्यक्रम झाला. देवस्थानचे मुख्य पुरोहित मोहन गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली पुरोहित मंदार महाराज पुजारी, व्यंकु महाराज पुजारी यांच्या मंत्रोपचारात विश्वस्त अध्यक्ष महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, विश्वस्त आत्माराम घाटगे, नागनाथ जेऊरे, ऋषी लोणारी, नागनाथ गुजले, संजय पवार, बबन सोनार, पिंटू पवार यांच्यासह स्वामी भक्तांच्या उपस्थितीत भजन, गुलाल पुष्पवृष्टी करीत प्रकट दिन पाळणा कार्यक्रम झाला.
२४ तास दर्शन सेवा उपलब्ध करा
भाविकांनी एकाच वेळी एकाच मंदिर दर्शन घेतल्यास कमी वेळात स्वामीचे दर्शन होईल. उत्सव काळात अक्कलकोट येथील विविध स्वामी मंदिरात २४ तास दर्शन सेवा उपलब्ध केल्यास तासन तास रांगेत उभे राहण्याचा त्रास कमी होईल. दर्शन पद्धतीमध्ये मुख दर्शन, धर्म दर्शन, देणगी अर्पण दर्शन रांग अशा तिहेरी पद्धतीने दर्शन व्यवस्था करावी. भाविकांना जसा वेळ उपलब्ध असेल त्या पद्धतीने ते दर्शन घेऊ शकतील, अशी अपेक्षा स्वामी भक्त नरेश अहिर, अखिलेश नायकु, विशाल ऋषीकेश यांनी व्यक्त केली.