
Large crowd of voters for the Nagar Panchayat elections in Vadgaon maval news local elections2025
Maharashtra Local Body elections : वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आज मतदानाची प्रक्रिया उत्साहात पार पडत असून सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्यभरात सकाळी 7 वाजता मतदानास सुरुवात झाली. वडगाव शहरातही मतदानाचा वेग चांगला असून अनेक केंद्रांवर सकाळपासूनच रांगा दिसू लागल्या.
निवडणूक आयोगाने केलेल्या योग्य नियोजनामुळे मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतरीत्या सुरू आहे. मतदानासाठी नागरिकांना विविध केंद्रांवर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून निवडणूक अधिकारी परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. सकाळी 7.30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत 61.43 टक्के मतदानाची आकडेवारी राहिली आहे. यामध्ये दुपारी साडेतीन वाजेपर्यंत एकूण मतदान हे 12 हजार 192 आहे. यामध्ये 6 हजार 174 हे पुरुष तर 6 हजार 18 महिलांचे मतदान राहिले आहे. दुपारी 1.30 पर्यंत जवळपास 46 टक्क्यांच्या आसपास मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी मनिषा तेलभाते यांनी दिली आहे. पहाटेपासूनच मतदारांमध्ये चांगला उत्साह असल्याने मतदानाचा वेग अपेक्षेपेक्षा अधिक असल्याचेही त्या म्हणाल्या.
मतदारांमध्ये वाढता उत्साह
सकाळच्या थंड वातावरणातही नागरिकांनी मतदान केंद्रांकडे लवकरात लवकर धाव घेतली. ज्येष्ठ नागरिकांपासून तरुणांपर्यंत सर्वांनी मतदानात सहभाग घेतला. काही केंद्रांवर महिलांची मोठी उपस्थितीही दिसली. दुपारनंतर मतदानाचा वेग आणखी वाढेल, अशी अपेक्षा निवडणूक प्रशासनाने व्यक्त केली आहे.
सुरक्षेची प्रभावी व्यवस्था
मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी शहरभर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संवेदनशील केंद्रांवर विशेष पथके ठेवण्यात आली असून मतदान प्रक्रियेमध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सतत गस्त सुरू आहे.
हे देखील वाचा : आमदार धनंजय मुंडेंची होणार होती हत्या? आमदाराच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
जनतेचे आवाहन
निवडणूक प्रशासनाने सर्व नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.
“लोकशाहीला बळ देण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. मतदान करून योग्य उमेदवाराची निवड करा,” असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.