मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या निर्णयानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला असून या निषेधार्थ बारामती शहरात ओबीसी समाजाचा एल्गार मोर्चा प्रा . लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली बारामती शहरातून प्रांत कार्यालयासमोर काढण्यात आला. बारामती शहरातील भिगवन चौकातून सुरू झालेला मोर्चा , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुढे प्रांत कार्यालय समोर गेला. या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी प्रा. हाके यांनी मराठा समाजाला आरक्षणाच्या निर्णयासंदर्भात काढलेल्या अध्यादेशावरून ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खा. सुप्रिया सुळे व इतर नेत्यांवर प्रचंड टीका केली.
मराठा समाजाच्या ताब्यात अनेक सहकारी साखर कारखाने आहेत, अनेक शिक्षण संस्था आहेत, त्या आम्ही ओबीसींनी कधी मागितल्या नाहीत, किंवा मराठा समाजाकडे मोठ्या प्रमाणावर असलेली आमदारकी खासदारकी आम्ही मागितली नाही. मात्र आमच्या हक्काचे असलेल्या ओबीसी आरक्षणामध्ये मराठा समाजाचा समावेश करून ओबीसींवर मोठा अन्याय झाला आहे.
Maratha Reservation: “… आरक्षण शक्य नाही”; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचे खळबळजनक विधान
मनोज जरांगे पाटील यांनी खालच्या पातळीवर वक्तव्य करून धनगर ओबीसींचा मोठा अपमान केला आहे, धनगर समाजावर जातीवाचक शिवीगाळ केल्याने त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे. ओबीसींच्या या न्याय हक्कासाठी संपूर्ण राज्यभर आम्ही तीव्र आंदोलन करणार असून, वेळप्रसंगी न्यायालयात जाऊन मराठा समाजाला दिलेल्या ओबीसी आरक्षणाला आव्हान देणार असल्याचे हाके यांनी सांगितले. ही लढाई जातीची नसून पातीची आहे, कास्ट साठी नसून क्लास साठी असल्याचे हाके यांनी यावेळी सांगितले.
यावेळी विश्वासराव देवकाते पाटील यांनी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही आमची भूमिका आहे, मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता ते आरक्षण द्यायला हवे. मात्र ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्याने ओबीसींवर अन्याय झाला आहे. सरकारने ओबीसींवर अन्याय होऊ नये यासाठी योग्य मार्ग काढावा, ओबीसी आरक्षणासाठी आपण कायम समाजाबरोबर असल्याचे सांगितले. यावेळी किशोर मासाळ यांनी मराठा समाजाला दिल्या जाणाऱ्या आरक्षणावरून प्रचंड टीका केली.
यावेळी नवनाथ वाघमारे, नवनाथ पडळकर, बसपाचे काळुराम चौधरी,ॲड गोविद देवकाते, पांडुरंग मेरगळ, ॲड महेश ससाणे, किशोर मासाळ, बापूराव सोलनकर यांच्यासह इतरांनी आपल्या भाषणात आक्रमक भूमिका घेत ओबीसी आरक्षणाला सरकारने कोणताही धक्का लावू नये, असे आवाहन केले. धनगर समाजाला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यानंतर तहसीलदार शिंदे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात ॲड अमोल सातकर यांनी पोतराजाचा वेष धारण केला होता, तर किशोर मासाळ यांनी वासुदेवाचा वेष धारण केला होता. एकच पर्व, ओरिजनल ओबीसी सर्व!, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली