
मंचर : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील भोकरशेतवस्ती येथे रविवारी ( दि.१६) रात्री बिबट्याने शेतकरी संतोष किसनराव हिंगे यांच्या पोल्ट्रीच्या तारा तोडून पोल्ट्रीतील कोंबड्यावर ताव मारला. यात हिंगे यांच्या अंदाजे २५० गावठी कोंबड्या ठार झाल्या असून त्यांचे अंदाजे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. (Leopard attack on poultry shed)
याबाबत माहिती अशी की अवसरी बुद्रुक वळसेमळा मार्गे निरगुडसर रस्त्यालगत भोकरशेत वस्ती आहे. या ठिकाणी शेतकरी संतोष हिंगे यांची पोल्ट्री असून त्यांच्या पोल्ट्रीमध्ये ५०० गावठी कोंबड्या आहेत. या कोंबड्यांची पूर्णपणे वाढ झालेली असून दोन-तीन दिवसातच या कोंबड्या हिंगे मुंबई येथे विक्रीसाठी पाठविणार होते. रविवारी रात्री ११ ते १२ वाजताच्या दरम्यान बिबट्याने पोल्ट्री शेडच्या तारा तोडत पोल्ट्रीत प्रवेश करून सुमारे २०० ते २५० कोंबड्या ठार केल्या.
-७० हजार रुपयांचे नुकसान
शेतकरी संतोष हिंगे यांच्या पत्नी कल्पना हिंगे यांना रात्री वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर जाग आली असता त्यांनी बंगल्याच्या खिडकीतून बाहेर पाहिले. त्यावेळी त्यांना कोंबड्यांच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी बिबट्यालाही पाहिले, मात्र वीज नसल्याने त्या घराबाहेर आले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पोल्ट्रीचा शेडचा दरवाजा उघडून पाहिले असता पोल्ट्रीतील २०० ते २५० कोंबड्या बिबट्याने मारल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. यात त्यांचे सुमारे ७० हजार रुपये नुकसान झाले आहे. वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी भाजपचे आंबेगाव तालुका उपाध्यक्ष गुलाबराव हिंगे पाटील यासह शेतकऱ्यांनी केली आहे.