वारुळवाडी येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला; मांडीवर दोन दात तर पायावर पंजाने ओरखडले
नारायणगाव : कुत्र्याचा पाठलाग करत असताना एक बिबट्या पडक्या घरातील भिंतीवरून खाली पडला. साखरझोपेत असलेल्या घरातील व्यक्तींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हा प्रकार शुक्रवारी पहाटे जुन्नर तालुक्यात घडला. यावेळी आईच्या उशाला बिबट्या पडल्याचे पाहून मुलाने बिबट्याशी झुंज करत त्याला घरातून पिटाळले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. ‘काळ आला होता पण वेळ नाही’ अशीच ही हृदयद्रावक जीवाचा थरकाप उडवणारी घटना वडज गावात घडली.
आकाश मीननाथ चव्हाण (वय २५) हा युवक वडज (ता. जुन्नर) येथील गावठाणात आपली पत्नी व आई यांच्यासोबत साधारण पडक्या घरात राहतो. शुक्रवारी (दि.७) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास बिबट्या कुत्र्याच्या शिकारीच्या हेतूने घराजवळ आला. बिबट्याची चाहूल लागल्यावर कुत्र्याची पिल्ले पडक्या भिंतीवर चढली. बिबट्याही त्यांच्यापाठोपाठ घराच्या पडक्या भिंतीवर चढला. कुत्र्याची पिल्ले भिंतीवरून खाली उतरण्यात यशस्वी झाली. मात्र, या पडक्या भीतीवरून बिबट्या थेट घरात पडला.
बिबट्या भिंतीवरून जिथे पडला, तेथे आकाशची आई सविता चव्हाण व बाजूला सून आरती चव्हाण झोपल्या होत्या. याचवेळी झोप येत नसल्याने आकाश टीव्ही पाहत होता. अचानकपणे काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने आई घाबरली व जणू आपल्या घराची भिंतच पडली, असे तिला वाटले. मात्र, भिंत पडली नाही तर आपल्या घरात बिबट्या आलाय. हे तिच्या लक्षात आले. आईने पांघरलेल्या गोधडीतूनच मुलाला आवाज दिला. बिबट्या घरात आल्याची माहिती दिली.
आकाश त्याला हुसकावण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, तो बाहेर न जाता घराच्या तुळईवर जाऊन बसला. तिथून त्याला आकाशने हुसकवण्याचा प्रयत्न केला असता त्याने थेट आकाशच्या अंगावर तुळईवरून झेप घेतली व त्याच्यावर हल्ला केला. त्याचे दोन्ही हात बिबट्याच्या जबड्यात गेले. घरातील महिलांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या पुन्हा तुळईवर जाऊन बसला. आकाशाने तातडीने दरवाजा उघडून आई व पत्नीला बाहेर काढले व स्वतः काठी घेऊन बिबट्याला हुसकू लागला. बिबट्याने पुन्हा आकाशवर झेप घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बिबट्या व आकाश यांच्यात सुमारे दहा मिनिटं झटापट होऊन आकाशच्या हाताला बिबट्याचे दात लागले व त्यात तो जखमी झाला.
…अन् दारातून पळाला बिबट्या
दहा मिनिटं बिबट्याचा थरार या घरामध्ये सुरू होता. आकाशच्या काठीचा फटका बिबट्याला जोरात लागल्याने बिबट्या दरवाजावाटे बाहेर पळून गेला. आकाशच्या दोन्ही हाताला जखमा झाल्या असून, हाताला बिबट्याचे दात लागले आहेत.