
बारामती तालुक्यात बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण; पिंजरा लावण्याची केली मागणी
वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांकडून सदर बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी करूनही वनविभाग पिंजरा लावण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून परवानग्यांची आवश्यकता असल्याचे सांगून चालढकल करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते सुनील देवकाते यांनी वन विभागाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत नागरिकांचा जीव बिबट्या घेण्याची वाट वन विभाग पहात आहे का? असा सवाल व्यक्त करत या दोन दिवसांमध्ये वन विभागाने तातडीने पिंजरा बसवावा, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन उभे करू, असा इशारा त्यांनी नवराष्ट्रशी बोलताना दिला आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नरसह अन्य भागामध्ये बिबट्यांचे प्रमाण वाढले असून, अनेक ठिकाणी बिबट्या दर्शन देत असल्याने त्या भागातील नागरिक चिंतेत आहेत. त्यातच दौंड तालुक्यातदेखील बिबट्या आढळल्याने त्या भागातही ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. बारामती तालुक्यातील निरावागज परिसरामध्ये येळे वस्ती या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार बिबट्या आढळत असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आल्यानंतर, वनविभागाने बिबट्याच्या ठशांची तपासणी करून, या परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बसवली. यामध्ये बिबट्या आढळून आला.
ऊस गाळपाचा हंगाम सुरू
येळेवस्ती येथे संतोष कुंभार यांनी आपल्या घराच्या भोवती सीसीटीव्ही यंत्रणा बसवलेली आहे. यामध्ये देखील बिबट्या फिरत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणखीनच घाबरले आहेत. वनविभागाने या भागातील बिबट्या अन्य भागात दूरवर गेल्याचे स्थानिकांना सांगून चालढकल करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र काही शेतकऱ्यांनी पुन्हा निरावागज परिसरात बिबट्या आढळून आल्याचे सांगितले. ग्रामस्थांनी या भागात वनविभागाने पिंजरा बसवून बिबट्याला पकडावे, अशी मागणी वन विभागाकडे केली आहे.
बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा
दरम्यान सध्या साखर कारखान्यांचा ऊस गाळपाचा हंगाम सुरू आहे. या भागामध्ये उसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पहाटे अथवा रात्रीच्या वेळी उसाला पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते. मात्र या बिबट्यामुळे भर दिवसा देखील शेतात जाण्यास शेतकरी घाबरत आहेत. ऊस तोडणीसाठी मजुरांबरोबर त्यांची लहान मुले देखील असतात, अशावेळी बिबट्याने हल्ला केल्यास यामध्ये लहान मुलांचा अथवा नागरिकाचा बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी सुनील देवकाते यांच्यासह इतर ग्रामस्थांनी केली आहे.