
बारामती तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण तावरे, तर उपसभापतीपदी...
बारामती : बारामती तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी सांगवी येथील किरण रावसाहेब तावरे यांची तर उपसभापतीपदी गुणवडी येथील शुभांगी सुनील आगवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सभापती तावरे व उपसभापती आगवणे हे दोन्ही राष्ट्रवादीचेच आहेत. नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये अपेक्षेप्रमाणे बारामती पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीने एखादी निर्विवाद वर्चस्व राखले आहे.
सभापतीपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानुसार पंचायत समितीच्या सभागृहामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलेल्या पंचायत समिती सदस्यांच्या बैठकीत सर्वानुमते सभापती पदासाठी किरण तावरे तर उपसभापती पदासाठी शुभांगी आगवणे यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने, सभापतीपदी किरण तावरे, तर उपसभापतीपदी शुभांगी आगवणे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. दरम्यान यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नवनिर्वाचित सभापती तावरे व उपसभापती आगवणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दरम्यान नवनिर्वाचित सभापती किरण तावरे हे सांगवी या पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीमधून निवडून आले आहेत, त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बारामती तालुकाध्यक्ष म्हणून अनेक वर्ष काम पाहिले आहे, त्याचबरोबर बारामती तालुका संजय गांधी निराधार समिती योजनेचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी प्रभावीपणे काम केले आहे. सांगवी या ठिकाणी गेल्या अनेक वर्ष त्यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते.
तर शुभांगी आगवणे या गुणवडी या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीमधून निवडून आल्या आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली दिवंगत उपमुख्यमंत्री, अजितदादांच्या विचारानुसार बारामती तालुका पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन सर्व सदस्यांना बरोबर घेऊन आपण कार्यरत राहणार आहोत, तालुक्यातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन नवनिर्वाचित सभापती तावरे व उपसभापती आगवणे यांनी निवडीनंतर बोलताना दिले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप बांदल, गटविकास अधिकारी किशोर माने, राष्ट्रवादीचे गटनेते बाबा चोरमले आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.