
Leopard : चांदबिबी महाल परिसरात बिबट्याचे दर्शन, गाडीपासून अवघ्या पाच फुटावर होता उभा
सुनीलशेठ काळे हे नेहमी संध्याकाळच्या सुमारास चांदबिबी परिसरात फेरफटका मारतात. नेहमीप्रमाणे ते आपल्या चारचाकी गाडीने या परिसरातून जात असताना त्यांना झाडाझुडपातून काही तरी बाहेर येत असल्याचे दिसले. त्यांनी गाडीचा वेग कमी करून तेथे पाहिले असता, त्यांना चक्क बिबट्याचे दर्शन झाले. त्यांच्या गाडीपासून अवघ्या पाच फुटाच्या अंतरावरून बिबट्या गेल्याची माहिती त्यांनी दिली.
सुनील काळे पुढे म्हणाले की, मी चांदबिबी परिसरात नेहमी जातो. पण आतापर्यंत असा प्रकार तिथे घडला नव्हता. नशिबाने मी चारचाकी वाहनात होतो, नाही तर बिबट्याला हल्ला करण्याची संधी मिळाली असती. बिबट्या पाहताच क्षणी काळे यांनी पटकन त्याचे फोटो काढले, जेणेकरून प्रशासनाला त्याबाबत माहिती पुरवता येईल.
त्यांनी तातडीने आपल्या परिसरात येत इतर नागरिकांना चांदबिबी परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार असल्याची माहिती दिली. तेथे प्रवास करताना जपून करावा असे आवाहन त्यांनी नागरिकांना दिले. तसेच ही माहिती वनधिकाऱ्यापर्यंत पोहचवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. जेणेकरून वनअधिकारी तेथे काही उपाययोजना आखतील.
सुनील काळे यांनी परिसरात चांदबिबी येथे बिबट्या पाहिल्याचे सांगतात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. खासकरून चांदबिबी परिसरात नित्यनेमाने फेरफटका मारणाऱ्या नागरिकांना तेथे जावे की नाही असा प्रश्न पडला असून त्यांनी प्रशासनाकडे तातडीने यावर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.