
वाईच्या पश्चिम भागात बिबट्याची दहशत वाढली, शिवारात दररोज दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
गेल्या काही महिन्यांपासून बिबट्या घरात, शिवारात घुसून कुत्रे, शेळ्या, मेंढ्या आणि वासरांचे फडशे पाडत आहे. तरीही या गंभीर परिस्थितीकडे वाई वन विभागाने आजवर ठोस उपाययोजना केलेली नाही. परिणामी, पश्चिम भागात एखादी जीवघेणी दुर्घटना घडल्यावरच वन विभाग जागा होणार का? असा संतप्त सवाल जनतेतून केला जात आहे. पश्चिम भागातील भीतीयुक्त वातावरण लक्षात घेता वाई वन विभागाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांतून होत आहे.
मानवांवर हल्ला हाेण्याची शक्यता
शिरूर-जुन्नर-आंबेगाव पट्ट्याप्रमाणेच आता वाईच्या पश्चिम भागातही बिबट्याचा सततचा वावर जाणवत असून, मोकाट कुत्र्यांची संख्या घटल्याने पुढील काळात मानवांवर हल्ल्याची शक्यता वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वन विभागाने वैज्ञानिक निरीक्षण, सापळे, कॅमेरे किंवा मानवी वस्तीत घुसखोरी रोखण्याच्या उपाययोजना केल्याचे दिसत नाहीत.
वाढत्या हालचालींनी नागरिक असुरक्षित
दरम्यान, मांढरदेव पठार परिसरात आधीच रानडुक्कर, मोर आणि इतर वन्य प्राण्यांच्या हल्ल्याने शेतकऱ्यांची कंबर मोडली असताना आता बिबट्याच्या वाढत्या हालचालींमुळे नागरिकांचे जीवन अक्षरशः असुरक्षित झाले आहे. रात्री-अपरात्री शेताला पाणी देणेही शेतकऱ्यांना धोक्याचे झाले असून, डोंगरालगतची शेती अनेकांनी सोडून दिल्याची स्थिती आहे.