कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणीच्या जिनसेन मठातील आठ दिवसापूर्वी अंबानींच्या गुजरात वनतारामध्ये माधुरी उर्फ महादेवी हत्तीण्णीला सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पाठविण्यात आले होते.
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणीच्या जिनसेन मठातील आठ दिवसापूर्वी अंबानींच्या गुजरात वनतारामध्ये माधुरी उर्फ महादेवी हत्तीण्णीला सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पाठविण्यात आले होते. माधुरीने निरोप घेतला त्यादिवशी हत्तीणीसह अखंड कोल्हापूरकरांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा पहायला मिळाल्या. यानंतर हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापूरकरांनी कंबर कसली तब्बल ४५ किलोमिटरची आत्मक्लेश पदयात्रा काढली अन् याची दखल प्रत्यक्ष वनताराला मराठीमध्ये घ्यावी लागली. कोल्हापूरकरांसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा अप्रत्यक्ष भाषाभिमानाच्या विजयाची घटना ठरली. बुधवारी वनतारा प्रशासनाच्या टिमने नांदणी मठाच्या महाराजांसह प्रसार माध्यमांशी बोलताना माधुरीला लवकरच नांदणीला परत देणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नांदणीची माधुरी पुन्हा दिमाखात नांदणी मठात सर्वांनाच पहावयास मिळणार आहे. एकंदरीत माधुरी हत्तीणीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात कोल्हापूर आणि नांदणी येथील नागरिक, तसेच विविध सामाजिक संघटनांनी आक्रमक आणि शांततामय या दोन्ही घटना लक्षात घेता, आंदोलने, कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात जिओ बॉयकॉट आणि माधुरी कम बँकचा नारा दिला. तसेच गावागावात प्रशासनाला निवेदने देऊन सरकारवर दबाव आणून वनतारावर दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
या पार्श्वभूमीवर वनताराने आपले सर्व व्हीडिओ आणि पत्र अधिकृत निवेदनही मराठीत प्रसिद्ध करून जनतेच्या भावनांचा आदर केला. सोशल मिडियावर अद्यापही याचा ट्रेंड सुरू आहे. मागील आठ दिवसांत वनताराकडून जवळपास तीन निवेदने आणि तीन व्हिडीओ सादर करून माधुरीची पूर्ण देखभाल करण्यासाठी तिला मराठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. माधुरी किती चांगली आहे. तीला आम्ही काय खायला देतो. तिचे दिवसभराचे कसे नियोजन असते. यासह वनतारा ही प्राण्यांसाठी कसे काम करत आहे. असे अनेक मराठी व्हिडीओ सादर करून आपण किती चांगले आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र समाजासह सर्व धर्मीयांतून भावना तीव्र होत माधुरी नांदणीला परत आणायचीच तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला जात होता.
वनताराची टीम बुधवारी कोल्हापुरात दाखल
माधुरी हत्तीणीबाबत राज्यभर पडसाद उमटू लागल्यानंतर वनतारा हत्ती संवर्धन केंद्राने याची गांभीर्याने दखल घेऊन कोल्हापुरात चर्चेसाठी आले. यामध्ये वनतारा सीईओ विहान करणी यांचे शिष्टमंडळ कोल्हापुरला भेट देऊन हत्तीला परत नांदणीत सोडण्यासाठी सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करून त्यामध्ये आपली भूमिका सकारात्मक देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आता लवकरच ही प्रक्रिया सुरू होणार आहे.
आत्मक्लेश पदयात्रेनंतर प्रशासन आणखी गतीमान
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात नांदणी मठ ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत असा ४५ किमीचा विराट मुक निषेध मोर्चा काढण्यात आला. त्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माधुरी हत्तीबाबत आपण मंत्रालयात बैठक घेणार असल्याचे सांगितले. यानंतर वनतारानेही मराठीमध्ये निवेदनाद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयाला पूर्ण पाठींबा दिला. कोल्हापूरकरांनी उभारलेल्या लोकचळवळीला काही अंशी यश मिळत असले तरी माधुरीहत्तीण्णी परत येईपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचा ठाम निर्धार करण्यात आला आहे. मंगळवारी मंत्रालयात बैठक झाल्यानंतर बुधवारी वनताराच्या टिमने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली. माधुरी नांदणी मठाला परत देण्यासाठी वनतारा ने संमती दर्शवली त्यानुसार वनताराचे सीईओ ने नांदणी मठाच्या महाराजांची भेट घेतली. आणि वनताराची सकारात्मक भूमिका मांडली.
नांदणीचा जैन मठ आणि कोल्हापूरमधल्या लोकांच्या आम्ही मनापासून आदर करतो. माधुरीशी असलेले सर्व समुदायाचे खास आणि प्रेमळ नाते वनताराला पूर्णपणे समजते आणि त्याचा वनतारा मनापासून सन्मान करतो. वनताराची भूमिका केवळ सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माधुरीची काळजी घेण्यापुरती मर्यादित होती. स्थानांतरचा निर्णय आम्ही घेतलेला नाही, किंवा सुचवलेला नाही. कोल्हापूरकरांच्या भावना आम्हाला समजतात आणि आम्ही त्या मानतो. आमचा सहभाग न्यायालयीन आदेशापुरता मर्यादित असूनही, जर आमच्या कृतीमुळे कोणाला दुःख झाले असेल, तर आम्ही मनापासून क्षमा मागतो. मिच्छामी दुक्कडम. असे पत्र मराठीमध्ये सादर केले आहे. यामुळे कोल्हापूरकरांसह माधुरी हत्तीणीला आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्याला आता यश आले आहे.
Web Title: Mahadevi madhuri elephant return in nandani math vantara ambani kolhapur news