Maharashtra Exit Polls 2024: 'या' एक्झिट पोलनुसार 'मविआ'चा सुपडासाफ? महायुतीला 'इतक्या' जागांवर स्पष्ट बहुमत
Maharashtra Election 2024 Exit Polls: विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आज एकाच टप्प्यात मतदान पार पडलं. मतदान संपल्यानंतर सायंकाळी एक्झिट पोलचे अंदाज जारी करण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासातील आजपर्यंतची ही निवडणूक तशी ऐतिहासिकचं राहिली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत काट्याची टक्कर पहायला मिळत आहे. दरम्यान एक्झिट पोलच्या अंदाजात महायुतीला सत्ता मिळण्याची शक्यता आहे. पीपल्स पल्स एक्झिट पोलने देखील राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असल्याचा अंदाज दिला आहे.
काय सांगतो पीपल्स पल्सचा एक्झिट पोल
पीपल्स पल्सच्या एक्झिट पोलनुसार राज्यात पुन्हा एकदा महयुतीचे सरकार येताना दिसत आहे. महाविकास आघाडीला सत्ता स्थापन करण्यात अपयश दिसत आहे. पीपल्स प्लसच्या अंदाजानुसार राज्यात महायुतील 182 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडी शंभरी देखील पार करू शकत नाही असे चित्र पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीला विधानसभेत केवळ 97 जागा मिळतील असा अंदाज पीपल्स पल्सने व्यक्त केला आहे. त्यामुळे एक्झिट पोल हे केवळ अंदाज असले तरी हे अंदाज महाविकास आघाडीचे टेंशन वाढवणारे असल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा: Maharashtra Exit Polls Result 2024: महाराष्ट्रात कुणाचं सरकार येणार? काय आहे एक्झिट पोलचा अंदाज
राज्यात 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान
राज्यात आज विधानसभेकरिता मतदान पार पडत असताना 5 वाजेपर्यंत सुमारे 58.22 टक्के मतदान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर जिल्ह्यात झाले असून तेथे 67.97% झाले आहे. तर सर्वात कमी मतदान हे मुंबई शहरात झाले आहे. तेथे 49.07 % इतके मतदान झाले आहे. महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांसाठी एकूण 4136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामध्ये 3771 पुरुष, 363 महिला आणि 2 तृतीयपंथी उमेदवारांचा समावेश आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यंदा महायुतीकडून भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेस, उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट यांच्यात निकराची लढाई होत आहे. भाजपला सत्तेतून बेदखल करण्यासाठी महाविकास आघाडीने शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केल्याचे दिसत आहे. तर महाआघाडीच्या बाजूने वातावरण निर्माण होऊ न देण्यासाठी भाजपनेही आपली ताकद पणाला लावली आहे.
2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने महाराष्ट्रात 161 जागा जिंकल्या होत्या. यात भाजपला 105 तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला 44 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 54 जागा मिळाल्या. याशिवाय इतरांना 29 जागा मिळाल्या होत्या. यातही छोट्या पक्षांना 16 जागा मिळाल्या. तर 13 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. पण मुख्यमंत्रीपदावरून मतभेद झाल्याने ऐन सत्तास्थापनेच्या वेळी भाजप-शिवसेनेची युती तुटली. भाजपकडे बहूमत नसल्याने शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जात सरकार स्थापन केले. पण यावेळीची परिस्थिती वेगळी आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्य मोठी फूट पडली. त्यामुळे यावेळी महाराष्ट्रात सहा मोठे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले हेत. यावेळी महाविकास आघाडीकडून सर्वाधिक 101 जागांवर काँग्रेस आणि महायुतीकडून भाजप 149 जागांवर निवडणूक लढवत आहे.