मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra Legislative Council Election) 5 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा प्रचार आज संपला. या निवडणुकीबाबत महाराष्ट्रातील जनतेत प्रचंड उत्सुकता आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्यात प्रमुख लढत होत आहे.
वास्तविक, ही जागा महाविकास आघाडीचा भाग असलेल्या काँग्रेसची आहे. त्यामुळे पक्षाने सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले होते, मात्र, अखेरच्या क्षणी मोठी खेळी करत सुधीर तांबे यांनी उमेदवारी दाखल न करता त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांना अपक्ष म्हणून उभे केले. यानंतर पक्षाने पिता-पुत्राला निलंबित केले आहे.
सत्यजित हे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांचे पुतणे आहेत. अशा स्थितीत तांबे यांच्या बंडखोरीमुळे थोरात यांच्या प्रतिमेला मोठा फटका बसला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी यांना पराभूत करण्यात यश येते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्याचबरोबर शुभांगी पाटील यांना या जागेवरून विजयी करण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.
दुसरीकडे, तांबे यांना भाजपचा अप्रत्यक्ष पाठिंबा मिळत आहे. अशा स्थितीत रितसर मतदान होण्यापूर्वीच पडद्याआड मोठा खेळ खेळला जाऊ शकतो. ही निवडणूक थोरात यांच्यासाठीही सन्मानाचा प्रश्न बनली आहे. या 5 जागांसाठी 30 जानेवारीला मतदान होणार आहे, तर 2 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे.
‘या’ उमेदवारांमध्ये होणार लढत
याशिवाय नागपूर शिक्षक जागेवर भाजपचे नागो गाणार यांच्या विरोधात आघाडीचे सुधाकर अडागळे, अमरावती पदवीधर जागेवर भाजपचे रणजित पाटील विरूद्ध धीरज लिंगाडे, औरंगाबादमध्ये भाजपचे विक्रम काळे यांच्याशी किरण पाटील यांच्यात लढत आहे. कोकणात आघाडीचे बाळाराम पाटील हे भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात लढत आहेत.
भाजप-महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न
ही निवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न बनली आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष आपापल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.