“हनी ट्रॅपमध्ये महाराष्ट्रातले मंत्री, अधिकारी”; नाना पटोलेंच्या दाव्याने खळबळ, थेट पेन ड्राइव्ह दाखवला
कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आज विधानसभेत धक्कादायक दावा केला आहे. महाराष्ट्रातले मंत्री, मोठे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत. मुंबई, ठाणे, नाशिक, हनी ट्रॅपची केंद्रं बनली आहेत. यासंदर्भातील माझ्याकडे पेन ड्राइव्ह आहे आणि सरकारचं मत असेल तर आम्ही तो दाखवू शकतो, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून नाना पटोले नावं सांगणार का? याबाबत महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे.
‘दिनो मोरियाने तोंड उघडलं तर अनेकांचा मोरया होईल’ : एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना इशारा
नाना पटोले यांनी नक्की काय म्हटलंय?
राज्यातील काही मंत्री, ७२ हून अधिक अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकले आहेत. हनीट्रॅप करणाऱ्यांची गोपनीय माहिती गोळा केली जात आहे. तसेच काही अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं असून त्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा विचार केला. सरकार यावर काही बोलायला तयार नाही. त्यामुळे आज मी हा विषय विधानसभेत मांडत आहे.
हनी ट्रॅपच्या माध्यमातून राज्याची महत्त्वाची कागदपत्रं अँटी सोशल मुव्हमेंटच्या हाती चालली आहेत. मला कुणाचंही चारित्र्यहनन करायचं नसून या सगळ्याबाबत सरकार गंभीर नाही. साधं निवेदनही द्यायला तयार नाही. त्यामुळे अध्यक्षांनी याबाबत निर्देश द्यावेत, अशी विनंती नाना पटोलेंनी केली.
नाशिकचं हनी ट्रॅप प्रकरण गंभीर आहे असं आमदार जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांनीही या सगळ्या प्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी निवेदन द्यायला पाहिजे अशी मागणी केली. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आम्ही या मुद्द्याची दखल घेतल्याचं म्हटलं आहे.
या प्रकरणावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले, “या तक्रारीबद्दल मला माहिती नाही. पण, नाशिकसारख्या पुण्यभूमीचं नाव अशा प्रकरणांमध्ये यावं हे दुर्दैव आहे. हे सर्व ज्या व्यक्तीच्या नावाभोवती फिरतंय, त्या व्यक्तीचं राजकीय संबंध, राजकीय वर्तुळातील वागणूक पाहता महाराष्ट्रात नेमकं काय सुरू आहे, हे कळत नाही. केवळ पैसे कमावण्यासाठी माणूस कोणत्या पातळीवर घसरतोय? कोणत्या अनैतिकतेचा वापर करतोय? हे सर्व धक्कादायक आणि दुःखद आहे.” आता नाना पटोले यांनी विधानसभेत पेन ड्राइव्ह दाखवला आहे. ज्यानंतर सरकार काही भूमिका घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं असेल.