
Weather News: महाराष्ट्रात पावसाची उघडीप कायम; १७ सप्टेंबरला कुठे पाऊस, कुठे कोरडे हवामान?
कोकण-गोवा विभागासाठी १७ सप्टेंबरला हवामान विभागाने कोणताही विशेष इशारा दिलेला नाही. मात्र, किनारपट्टीवरील काही भागांत पाऊस आणि मेघगर्जनेसह सरी पडण्याची शक्यता आहे. मुंबईसह उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर काही ठिकाणी विखुरलेल्या सरींची शक्यता असून दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर तुलनेने अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाच्या किनारी बुलेटिनमध्ये नमूद करण्यात आली आहे.
हेही वाचा:
पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली आणि सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत स्थानिक वातावरणानुसार हलक्या सरी पडू शकतात. मात्र, सर्वदूर पावसाची शक्यता नसून काही ठिकाणी ढगाळ वातावरण, उष्णता आणि दमटपणा जाणवण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील अनेक भागांत पावसाची उघडीप कायम आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड आणि धाराशिव या भागांत पावसाचे प्रमाण स्थानिक स्वरूपाचे राहण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत काही भागांत पाऊस झाल्यानंतर पुन्हा विश्रांती मिळाल्याने पिकांसाठी आणखी पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
विदर्भासाठीही १७ सप्टेंबरला हवामान विभागाने कोणताही विशेष इशारा दिलेला नाही. त्यामुळे नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली भागांत मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि स्थानिक स्वरूपाच्या सरी मात्र पडू शकतात.
राज्यात सध्या सर्वदूर मुसळधार पावसाची स्थिती नसली तरी हवामानात स्थानिक पातळीवर बदल होत आहेत. त्यामुळे एखाद्या जिल्ह्यात किंवा परिसरात अचानक सरी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, बंगालच्या उपसागरासह इतर हवामान प्रणालींच्या हालचालींवर पुढील काही दिवस राज्यातील पावसाचे चित्र अवलंबून राहणार आहे. एकूणच, १७ सप्टेंबरला महाराष्ट्रात मोठ्या पावसाचा इशारा नसला तरी काही भागांत हलक्या सरींची शक्यता कायम आहे. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा असलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष आता पुढील हवामान अपडेटकडे लागले आहे.