फोटो सौजन्य - Social Media
देशभरात मराठी-हिंदी वाद अगदी टोकाला पोहचला आहे. सोशल मीडियावर नेटकरी भाषावादात इतके गुंतले आहेत की स्वतःचे संस्कार आणि अस्तित्वच विसरून बसले आहेत. मुळात, मराठी माणसं कुण्या भाषेच्या विरोधात नसून काही गैर-मराठी भाषिकांच्या वृत्तीच्या विरोधात आहेत, असे राज्यातील अनेक पक्षांनी तसेच मराठी संघटनांनी स्पष्ट केले आहे. पण काही इतर राज्यातील नेत्यांकडून या भाषिक वादाला वाढवून मुद्दाम मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘जर तुम्ही दशकांपासून महाराष्ट्रात राहता पण मराठीचा ‘म’ही तुम्हाला माहीत नसतो, तर यामागचे कारण काय?’ असा सवाल मराठी माणूस नेहमीच उपस्थित करत असतो. अशामध्ये काही पर-राज्यातील नेत्यांनी सरळ महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्मितेला टार्गेट केला आहे. पण मराठी अस्मिता त्यांच्या विचारांच्या पलीकडे आहे, कारण या देशाला महाराष्ट्राने आणि या मराठी माणसाने अनेक महत्वाच्या गोष्टी दिल्या आहेत. देशाच्या विकासात आणि इतिहासात मराठी माणसाचे योगदान फार मोठे आहे.
भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके हे मराठीच!
सोशल मीडियावर जेव्हा ‘मराठी-हिंदी’ वाद टोकाला गेला. तेव्हा अनेक गैर-मराठी भाषिकांनी या लढ्याचा उद्देश ‘हिंदी द्वेष’ असल्याचे समजून लढ्याला वेगळाच आकार दिला आणि सरळ मुंबईमध्ये स्थित हिंदी सिनेसृष्टी बॉलिवूडवर सवाल उपस्थित केला. मुळात, हिंदी सिनेसृष्टीचा म्हणजेच बॉलीवूडचा पायाच मराठी आहे. या मराठी माणसाने देशाला सिनेमा दाखवला. भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके हे मराठीच!
स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणारे सावित्रीबाई ज्योतिराव फुले हे मराठीच!
आधी संपूर्ण भारतभरात स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. ‘चूल आणि मुलं’ इतकाच काय तो भारतीय स्त्रियांचा संसार होता. पण सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले या मराठी माणसांच्या लढ्यामुळे आज देशभरातील प्रत्येक स्त्रीला शिक्षण घेण्याचा हक्क आहे. आणि हो! तो हक्क मिळवून देण्यासाठी या समाजापुढे छाती ताठ करून उभा राहणारा मराठी माणूसच होता.
भारताचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मराठीच!
ज्या कायद्यावर संपूर्ण देश चालतंय. ज्या तत्वांवर देशाचा संपूर्ण कारोभार चालतोय, ते संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहले आहे. मराठीचा आणि मराठी अस्मितेवर काहीही विधानं करणारी मंडळी आज चांगल्या पद्धतीने जीवन जगत आहेत. मोठमोठ्या पदावर आहेत, तेदेखील एका मराठी माणसामुळेच! कारण कायदा मराठी माणसाच्या लेखणीतून लिहला गेला आहे.
देशाला खेळाचा, साहित्याचा आणि कलेचा वारसा दिला
देशाला कलेचा, खेळाचा आणि साहित्याचा वारसा देणारादेखील मराठी माणूसच! क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर मराठीच! भारताची गानकोकिळा म्हणून जगभरात भारतीय संगीताचा डंका वाजवणारी गायिका भारतरत्न लता मंगेशकर मराठीच! भारताची पहिली महिला डॉक्टर आळंदीबाई गोपाळ जोशी, होय त्या ही मराठीच!
महाराष्ट्राचा इतिहास ऐकून अंगावर शहारे येण्यासाठी तुमचे रक्त मराठीच असणे गरजेचे नाही, अशी काही जादू आहे महाराष्ट्रातील या मराठी रक्तात! महाराष्ट्राचा इतिहास ऐकून भल्या-भल्यांनी आपली मान झुकवली आहे. पण जेव्हा या मराठी माणसासाठी काही समाजकंटकांकडून असे अपमानजनक शब्द निघतात, तेव्हा त्यांना या इतिहासाची जाणीव करून देणे काळाची गरज असते.