Maharashtra Politics: ‘… अन्यथा बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित करणार’; प्रताप सरनाईकांचा इशारा
सातारा-रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवरील ऐतिहासिक रघुवीर घाटावर नजर ठेवणारा महिमंडणगड हा महत्त्वाचा वनदुर्ग आहे. घनदाट जंगल, खोल दऱ्या, उंच डोंगररांगा आणि गडावरील ऐतिहासिक अवशेषांमुळे हा परिसर दुर्गप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो.सातारा जिल्ह्याच्या महाबळेश्वर तालुक्यातील मेटसिंदी गावातून गडाकडे जाणारी पायवाट घनदाट जंगलातून जाते. महिमंडणगड समुद्रसपाटीपासून सुमारे ३०७० फूट उंचीवर आहे. गडमाथा दोन टेकड्यांमध्ये विभागलेला आहे. गडावर भैरी भवानीचे मंदिर असून, दगडात खोदलेल्या सुमारे १० ते १२ पाण्याच्या टाक्या आढळतात. दोन बुरुजांच्या मध्यभागी असलेल्या प्रवेशद्वाराचे अवशेष आजही इतिहासाची साक्ष देत आहेत.
गडावर पोहोचल्यानंतर ग्रुपच्या दुर्गमित्रांनी मंदिर परिसराची स्वच्छता केली. त्यानंतर जलाभिषेक, फुलांची सजावट, नैवेद्य व आरती करण्यात आली. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’, जय भवानी…जय शिवाजी’ आदी जयघोषांनी गडमाथा दुमदुमून गेला.
दरम्यान, मोहिमेदरम्यान गडावर जाणाऱ्या मार्गावर दिशादर्शक खुणा नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रथमच येणारे शिवप्रेमी व ट्रेकर्स घनदाट जंगलात भरकटण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन आगामी काळात आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक, भगवे झेंडे व रेबीन लावणे, तसेच चुन्याने मार्गाचे मार्किंग करण्याचे काम हाती घेण्याचा निर्धार ‘शिवमुद्रा ट्रेकर्स’ने केला. दुर्गभ्रमंती ही केवळ पर्यटन न राहता इतिहास, संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाची चळवळ बनावी, असा या संदेश मोहिमेतून देण्यात आला. गडावर प्लास्टिक व कचरा न टाकणे, पाणीसाठे स्वच्छ ठेवणे आणि ऐतिहासिक अवशेषांना हानी न पोहोचविण्याचे आवाहनही करण्यात आले.
या मोहिमेत दुर्गमित्र समीर अराणके, राजेंद्र मोहिते, सौरभ कुंभार, गुरुनाथ साने, जयवंत मोहिते, प्रसाद ढवळीकर सहभागी झाले होते. विशेष म्हणजे ग्रुपचा सदस्य असलेला रुसी नावाचा श्वानही या मोहिमेत सहभागी झाला होता. संपूर्ण गडवाटेवर प्रत्येकावर लक्षात ठेवणाऱ्या या सहकाऱ्याच्या सहभागामुळे मोहिमेतील उत्साह आणखीच दुणावला होता. महिमंडणगडाच्या भ्रमंतीतून ऐतिहासिक व नैसर्गिक अशा दोन्हींचा अद्भुत मिलाप पहायला मिळतो. दुर्गभ्रमणावेळी इतिहासाची अनुभूती घेत गड आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश पुढे नेण्याचा प्रयत्न ‘शिवमुद्रा ट्रेकर्स’ने केला.






