परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (फोटो- ai gemini)
मुंबई महानगर क्षेत्रात आज झालेल्या तपासणीत ३,९९५ वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६०४ चालकांना व्यवहारिक मराठीचे पुरेसे ज्ञान नसल्याचे आढळून आले असून, या सर्वांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. उर्वरित राज्यातील आकडेवारीनुसार आतापर्यंत ४,२२२ चालकांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ६६४ चालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.
“महाराष्ट्रात व्यवसाय करून प्रवाशांशी थेट संवाद साधणाऱ्या व्यावसायिक वाहनचालकांना व्यवहारिक मराठी येणे ही केवळ नियमांची बाब नाही, तर प्रवाशांच्या सोयी-सुरक्षेशी संबंधित बाब आहे. चालकांना मराठी शिकण्यासाठी पुरेसा कालावधी दिला जात आहे. मात्र, दिलेल्या मुदतीनंतरही नियमाचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
ही तपासणी मोहीम ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. तपासणीदरम्यान चालकांना व्यवहारिक मराठीचे ज्ञान तपासले जाईल. मराठीचे ज्ञान नसलेल्या चालकांना सुधारणा करण्याची संधी देण्यात येणार असली, तरी त्यानंतरही नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात विहित मुदतीनंतर बॅज निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.
“मराठी शिकण्यासाठी संधी आहे; नियम टाळण्यासाठी मुभा नाही,” असा स्पष्ट संदेश परिवहन विभागाने या मोहिमेच्या माध्यमातून दिला आहे. असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रात ऑटोरिक्षा आणि टॅक्सी संवर्गातील एकूण ९ लाख ७८ हजार ५४१ वैध परवाने आहेत. यामध्ये ९ लाख १६ हजार ८८४ ऑटोरिक्षा आणि ६१ हजार ६५७ टॅक्सी परवान्यांचा समावेश आहे. मुंबई महानगर क्षेत्रातच सुमारे ४ लाख ६२ हजार ३८७ रिक्षा आणि टॅक्सी परवानाधारक आहेत.






