
फोटो सौजन्य - Social Media
Makarand Patil यांनी जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत असल्याचे स्पष्ट करत नागरिकांना इंधन टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात इंधन तुटवड्याच्या चर्चेमुळे अनेक पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठी गर्दी होत असून काही ठिकाणी अनावश्यक साठेबाजीही केली जात आहे. यामुळे प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवत नागरिकांनी संयम बाळगावा, आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करावे आणि पेट्रोल पंपांवर गर्दी टाळावी, असे सांगितले आहे.
पालकमंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. सर्व ऑईल कंपन्यांकडून नियमितपणे पुरवठा सुरू असून पुरवठा साखळी कुठेही खंडित झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त इंधन साठवण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रशासन सर्व पेट्रोल पंप चालक आणि ऑईल कंपन्यांच्या सातत्याने संपर्कात असून प्रत्येक ठिकाणी सुरळीत पुरवठा होईल, याची दक्षता घेतली जात आहे.
गुरुवारी विविध ऑईल कंपन्यांकडून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा करण्यात आला. बीपीसीएलकडून १ लाख २ हजार ५०० लिटर पेट्रोल आणि ३ लाख ५ हजार ५०० लिटर डिझेलचा पुरवठा झाला. एचपीसीएलकडून १ लाख ५ हजार लिटर पेट्रोल आणि ३ लाख ७४ हजार लिटर डिझेल पुरविण्यात आले. तर आयओसीएलकडून ६ लाख ८० हजार लिटर पेट्रोल आणि ७ लाख २५ हजार लिटर डिझेलचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली.
गॅस सिलिंडरबाबतही जिल्ह्यात कोणतीही कमतरता नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांचे मिळून जिल्ह्यात ४ लाख ६३ हजार ४९४ नियमित ग्राहक आहेत. तसेच उज्ज्वला योजनेअंतर्गत २ लाख ५ हजार ७१५ लाभार्थ्यांना सेवा पुरवली जात आहे. दररोज जवळपास ७ हजार ९५० गॅस सिलिंडर ग्राहकांपर्यंत पोहोचवले जात असून १६ हजार ४४८ सिलिंडरचा राखीव साठाही उपलब्ध ठेवण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेले इंधन पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिले जाईल, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा कायम ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी केवळ गरजेपुरतेच इंधन खरेदी करावे, साठेबाजी टाळावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनालाही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी होऊ नये आणि कोणतीही गैरसोय निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क असल्याचेही त्यांनी नमूद केले.