
भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच; बाबाराजे देशमुखांनी केला प्रवेश
नातेपुते : जलसंधारण व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागाचे ज्येष्ठ नेते शहाजीराव उर्फ बाबाराजे देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धैर्यशील देशमुख यांनी केले. ऍड. बी. वाय.राऊत, हनुमंत सुळ यांनी भाजप बद्दलचे मनोगत व्यक्त केले.
बाबाराजे देशमुख म्हणाले, माझा भाजपचा प्रवेश काही कारणास्तव लांबला. अकलूज निवडणुकीच्या अगोदर प्रवेश झाला असता तर खूप छान झाले असते. 1980 सालापासून राजकारण करत प्रामाणिकपणे मोहिते पाटील यांच्या पाठीशी उभा राहिलो. पण सध्या परिस्थिती बदलण्याची गरज आहे. माळशिरस तालुक्यातील भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी मला पाठिंबा दिला. आगामी जिल्हा परिषद व पंचायत निवडणुकीमध्ये भाजपच्या माध्यमातून निवडून आणू व रामभाऊंना साथ देऊ, असे ते म्हणाले
राम सातपुते म्हणाले, अकलूजमध्ये मोहिते पाटलांच्या विरोधात कोणी जायला तयार नव्हते. बूथ लावायला माणसे भेटत नव्हती तेथे नगरपालिकेमध्ये आम्ही दहा हजार मते घेतली. चार नगरसेवक निवडून आणले. आम्ही लढलो ४१ टक्के मतदान भाजपला मिळाले. तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये बाबाराजे देशमुख यांसारखे नेते आम्हाला मिळाले. ते आता भाजपमध्ये आल्याने घरातील माणूस म्हणून आम्ही त्यांना साथ देऊ. तुम्ही ताकतीने पश्चिम भागात काम करा, अकलूज सोडून मोहिते पाटलांचा कुठेही नगरसेवक निवडून आलेले नाही. माळशिरसच्या कानाकोपऱ्यात भाजप उभा राहील.
अकलूजमध्ये परिवर्तन होणार
रणजितसिंह नाईक म्हणाले, माळशिरस तालुक्यातील रेल्वेचे टेंडर मंजूर झाले आहे. माळशिरस तालुक्यातील गुलामगिरीची पद्धत घालवण्यासाठी राम सातपुतेंसारखं खंबीर व्यक्तिमत्व उभा आहे. मोहिते पाटलांनी कारखाना पतसंस्था बुडवल्या. निरा देवधरचे पाणी आणण्याचे श्रेय फुकट घेतात. भाजपच्या माध्यमातून अकलूजमध्ये परिवर्तन होणार आहे. दहशतवाद संपवला जाणार आहे आणि माळशिरस तालुक्यात कमळ फुलणार आहे.
पश्चिम भागाचा विकास निश्चित
गिरीश महाजन म्हणाले की, सहकार, राजकारण, शिक्षण क्षेत्रातील मोठा अनुभव नातेपुतेतील बाबाराजे देशमुख परिवाराला आहे. राष्ट्रप्रेम देशभक्ती त्यांच्यामध्ये आहे. मोहिते पाटलांना सोडून अकलूजमध्ये विकास होणे अशक्य होते. त्या ठिकाणी रामभाऊ सातपुते, जयकुमार गोरे रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून परिवर्तन घडले. रामभाऊ सातपुतेंच्या माध्यमातून पश्चिम भागाचा विकास निश्चित आहे.
विकास करण्यासाठी कार्यकर्त्यांचा प्रवेश
ते पुढे म्हणाले, माळशिरस तालुक्यात पश्चिम भागातून बाबाराजे देशमुख यांच्यासारखा तगडा नेता भाजपला मिळाला. आगामी काळामध्ये माळशिरस तालुक्यात सर्व ठिकाणी भाजपची सत्ता येणार आहे. त्यासाठी बाबाराजे देशमुख यांच्या पाठीशी भाजप खंबीरपणे उभे राहील, माळशिरस तालुक्यातील महाविकास आघाडीचे सर्व बालेकिल्ले उध्वस्त होत आहे. नगरपालिका निवडणुकांमध्ये 288 पैकी फक्त 50 नगरपालिका महाविकास आघाडीकडे गेल्या, संपूर्ण सत्ता भाजपची आली आहे, आपल्या भागातील विकास करण्यासाठी अनेक पदाधिकारी कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.
विविध मान्यवर, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
आपल्या भागातील विकास करण्यासाठी अनेक पदाधिकारी कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, आज तीनशे लोकांनी प्रवेश केला. त्यामध्ये सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन, संचालक, यांनी प्रवेश केला. या कार्यक्रमास रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुते, फत्तेसिह माने पाटील, पांडुरंग देशमुख, धैर्यशील देशमुख, नाथाजीराव देशमुख, मालोजीराजे देशमुख,हेमंत देशमुख, हनुमंतराव सूळ, बी. वाय. राऊत, राजन पाटील, चेतन सिंह केदार, प्रकाश पाटील, संजय गरुड, सुजय माने पाटील, अविनाश सूर्यवंशी, बाळासाहेब सरगर, आप्पासाहेब देशमुख, प्रशरथ मोरे, हनुमंतराव सुळ, धनंजय पाटील, संजय देशमुख, राजेंद्र पांढरे उपस्थित होते.