
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालवणमध्ये नाकाबंदी दरम्यान पकडलेल्या कारमधून दीड लाखांची रोकड आणि काही पाकिटे सापडल्याने खळबळ उडाली होती. निवडणूक विभागाचे पथक आणि पोलिसांनी मालवण पिंपळपार परिसरात वाहनांची तपासणी केली असता, एका कारमध्ये ही रोकड आढळली. पुढील तपासासाठी कार मालवण पोलिस ठाण्यात आणण्यात आली. ही कार देवगड येथील भाजप पदाधिकाऱ्यांची असल्याचे समोर आले. त्यावेळी ते वाहनातच उपस्थित होते. पोलिसांनी त्यांची चौकशी केली. दरम्यान, मालवण येथील दोन भाजप पदाधिकारी पोलीस ठाण्यात पोहोचले आणि कार सोडून देण्याबाबत पोलिसांशी चर्चा केली.
Top Marathi News Today Live : राज्यातील 226 नगरपरिषदांसह 38 नगरपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात
या घडामोडींची माहिती मिळताच शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी आमदार निलेश राणे यांना कळवले. त्यानंतर निलेश राणे स्वतः रात्री १२ वाजता पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी या प्रकरणात ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत पोलिस ठाण्याबाहेरून हलणार नाही, अशी भूमिका घेतली आणि काही काळ ठाण मांडून बसले. ज्या कारमध्ये पैसे सापडले त्या वाहनातील भाजप पदाधिकारी तसेच मालवणमधील भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ठाण्यात थांबवून ठेवले होते. या घडामोडींमुळे मालवणमधील निवडणूक वातावरण आणखी तापले असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.
निलेश राणे पोलिस ठाण्यात असतानाच आणखी एक कार आली. ही कार भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सोडवण्यासाठी आली असल्याच आरोप आमदार निलेश राणेंनी केला. महत्त्वाची बाब म्हणजे, या वाहनावर पुढे आणि मागे कोणतीही नंबर प्लेट नव्हती, तर पुढील सीटवर भाजपचे चिन्ह असलेला गमछा असल्याचे दिसून आले. या संपूर्ण प्रकारामुळे मालवणमधील निवडणूक वातावरण आणखी तापले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालवणमध्ये झालेल्या कारवाईनंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलिसांसोबत सौदेबाजी करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप निलेश राणे यांनी केला. पोलिसांच्या विशेष पथकाने दीड लाखांची रोकड असलेली कार पकडल्यानंतर भाजपचे देवगड तालुका अध्यक्ष महेश नारकर, आदित्य पाताडे आणि बाबा परब यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या तिघांकडे ही रोकड सापडल्याचा आरोप निलेश राणेंनी केला. याप्रकरणी पोलिसांनी सुमोटो तक्रार नोंदवली.
दुसरीकडे, आमदार राणेंनी एका व्हिडीओचा हवाला भाजप पदाधिकाऱ्यांवर आरोपही केले आहेत. भाजप पदाधिकारी बाबा परब हे पोलिसांशी प्रकरण मिटवण्यासाठी वाटाघाटी करत होते. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पोलिसांना, “तुम्ही गाडीत सापडलेले पैसे ठेवून घ्या, पण कार्यकर्त्यांना सोडा,” असे सांगताना दिसत असल्याचा आरोप निलेश राणेंनी केला.
मात्र, व्हिडीओत पोलिसांनी संबंधित व्यक्तीला निवडणूक अधिकारी तपासासाठी आले आहेत आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पुढील कारवाई होईल, असे सांगताना दिसते. या घटनेमुळे मालवणमधील निवडणूक वातावरण चांगलेच तापले असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.