manoj jaranage patil
नाशिक : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. मात्र त्यापूर्वी राज्यात आरक्षणावरुन राजकारण रंगले आहे. मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला असून नेत्यांच्या गाड्या अडवण्याचे प्रमाण वाढले आहे. राजकीय नेत्यांनी भूमिका जाहीर करण्याची मागणी मराठा बांधव करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी शांतता ऱॅलीचा दुसरा टप्पा सुरु केला आहे. मराठवाड्यामध्ये पहिली शांतता रॅली पार पडल्यानंतर दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुरु केला आहे. यावेळी त्यांनी निवडणूका लढवण्याचा निर्णय ठाम असल्याचे म्हणत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणूका लढण्याच्या निर्णयावर ठाम असून आरक्षण मिळाले नाही तर सर्व जागा लढवणार असल्याचे सांगतिले आहे. जरांगे पाटील म्हणाले, “महाराष्ट्रामधून 17 ते 18 टक्के मराठा समाज मुंबईमध्ये गेलेला आहे. मग आपण तेथे उमेदवार निवडून आणू शकलो नाहीत, तरी तेथील 19 जागांचा कार्यक्रम केला म्हणून समजा. म्हणजे पाडलेच म्हणून समजा. आपण तेथेही शोध मोहीम सुरु केलेली आहे. आता कोकणातील काही भाग अजून बाकी राहिला आहे, तर मराठावाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ हे तीनही विभाग एका बाजूला आहेत. या तीनही विभागात यांचा सुपडा साफ होणार आहे”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
जे ठरेल त्यामागे ठाम उभे राहा
आगामी विधानसभा निवडणूकांसाठी जरांगे पाटील यांनी त्यांचे नियोजन सुरु देखील केले आहे. इच्छुकांचे अर्ज मागवण्यात येत असून त्यांची मुलाखत स्वतः जरांगे पाटील घेणार आहेत. निवडणूकांबाबतत जरांगे पाटील यांची तयारी सुरु झाली असून ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्यात यावे अशी मागणी त्यांची आहे. ही मागणी पूर्ण न केल्यास आरक्षणामध्ये आल्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही. ते म्हणाले, मराठा समजाला आरक्षण दिले नाही तर विधानसभा लढणार. मराठा समाजाची कसोटी लागलेली आहे. याबाबत 29 ऑगस्ट रोजी महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत जे ठरेल त्यामागे ठाम उभे राहा”, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले.