
राजकीय घडामोडींना वेग; याद्या जाहीर होण्याआधीच बंडखोरीची चुणूक
जागा वाटपात आणि उमेदवारी यादीतून आपण डावलले जावू, अशा शक्यतेने काही इच्छुकांनी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने केली. भाजपशी वाटाघाटी झाल्या त्यात नीलम गोऱ्हे आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांचा समावेश होता. या कारणाने कार्यकर्त्यांचा राग नीलम गोऱ्हे यांच्यावर होता. आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मोर्चा रोखण्यासाठी नीलम गोऱ्हे यांना पोलीस बंदोबस्त मागवावा लागला.
चारच दिवसांपूर्वी भाजपच्या पुण्यातील कार्यालयासमोर सात, आठ कार्यकर्त्यांनी धरणे धरले आणि स्टेशन भागातील एका कार्यकर्त्याच्या पक्षप्रवेशाला विरोध केला. भाजपमध्ये जुने निष्ठावंत आणि नवे असा अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. भाजपमध्ये घाऊक प्रमाणात पक्षप्रवेश झाले. त्यावरून मतदारांमध्येही नाराजी व्यक्त झाली आहे. उमेदवारीबाबत ज्या बातम्या येत आहेत, त्यातून स्पष्ट दिसते की, आमदार, नेते आपल्या मुलांची, नातेवाईकांची वर्णी लावून घेत आहेत. त्यातून भाजपमधील घराणेशाही हा ही एक नाराजीचा विषय झालेला आहे. अशा पार्श्वभूमीवर भाजपची उमेदवारी जाहीर होईल तेव्हा तीव्र पडसाद उमटल्याशिवाय रहाणार नाहीत.
तिकीट वाटपानंतर भाजपमध्ये तोडफोड झाल्याच्या घटना त्यापूर्वी घडलेल्या आहेतच. स्वीकृत सदस्य निवडण्यावरूनही भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांनी महापालिका भवनात तोडफोड केली होती. दोन दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये नाराज कार्यकर्त्यांना सामोरे जाताना भाजपचे नेते, मंत्री गिरीश महाजन यांची चांगलीच तारांबळ उडालेली महाराष्ट्राने पाहिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी झालेली आहे. तिथेही यादी जाहीर झाल्यावर कार्यकर्त्यांमध्ये राजी-नाराजीच्या प्रतिक्रिया उमटणार आहेत. काँग्रेस पक्षातील गटबाजीही उघड आहेच. तिथेही काही प्रभागात उमेदवारीवरून वाद होतील, अशी चिन्हे आत्ताच आहेत.
ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मते भल्या मोठ्या प्रभागात अपक्ष म्हणून निवडणूक लढविणे प्रचंड खर्चाचे आहे. त्यामुळे बंडखोरी करण्यास फार कोणी धजावणार नाहीत. नाराजी उमटेल, भांडणे होतील, पण, प्रत्यक्ष बंडखोरी करण्यास कोणी धजावेल, अशी शक्यता नाही. असे असले तरी ज्या प्रमाणात तीर्थयात्रा, सहली आणि विविध हथकंडे अजमावण्यात येत आहे त्यावरून मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली तर आश्चर्य वाटू नये, अशीच परिस्थिती आहे.