अजित पवारांचा भाजपला धक्का! 'हे' बडे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार; तारीखही ठरली
पाटस : पुणे जिल्ह्यासह राज्यातील अनेक मातब्बरांना भारतीय जनता पक्षात प्रवेश देऊन दौंडचे आमदार राहुल कुल यांनी पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात भाजपाची राजकीय ताकद वाढवली होती. मात्र आमदार राहुल कुल यांच्याच बालेकिल्ल्याला सत्ताधारी महायुतीतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावरच सुरुंग लावला आहे. येत्या १७ ऑक्टोबर ला दौंड शहरासह तालुक्यातील अनेक भाजपचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत, ही माहिती भाजपचे माजी शहराध्यक्ष स्वप्नील शहा यांनी मंगळवारी ( दि १४) पत्रकार परिषदेत दिली. दौंड शहर भाजप व्यापारी आघाडीचे माजी शहराध्यक्ष स्वप्नील शहा हे मागील अनेक दिवसांपासून पक्षश्रेष्ठींवर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.
भाजपच्या गोटात खळबळ
काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ते आता कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याकडे लक्ष लागले होते. स्वप्नील शहा हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा ही राजकीय वर्तुळात होती. शहा यांच्या राजीनाम्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली होती. त्यातच माजी आमदार रमेश थोरात आणि माजी जिल्हा परिषद सदस्य विरवधल जगदाळे हे शहा यांच्या संपर्कात होते. अखेर माजी आमदार रमेश थोरात यांनी शहा यांना राष्ट्रवादीत आणण्यात यश मिळवले आहे. एकेकाळी भाजपचे निष्ठावंत असलेले स्वप्नील शहा, आमदार राहुल कुल यांचे खंदे समर्थक नंदु पवार यांच्यासह अनेक भाजपचे पदाधिकारी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. ही माहिती स्वप्नील शहा यांनी दिली.
निवडणुकीच्या तोंडावर राजकीय धक्का
सध्या भाजपमध्ये सुरू असलेली मनमानी कारभार आणि पक्षातील वैचारिक मतभेद यामुळे मी आणि माझे कार्यकर्ते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे, मी भाजपचा एक निष्ठावंत कार्यकर्ता होतो मात्र आता यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत म्हणून काम करेल, आगामी दौंड नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष असेल यासाठी पुर्ण ताकदीने मैदानात उतरणार, असा निर्धार यावेळी शहा यांनी बोलून दाखवला. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत आमदार राहुल कुल यांचे दौंड शहरात मताधिक्य वाढविण्यात मोठी भुमिका बजावणारे जेष्ठ नेते नंदु पवार आणि स्वप्नील शहा यांचे मोठे योगदान असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे, मात्र आगामी नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावरच भाजपला मोठा राजकीय धक्का बसला आहे.