सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का; 'या' नेत्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
सोलापूर : आगामी स्थानिक स्वराज संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष हे तयारीला लागले आहेत. सध्या विरोधी पक्षातून अनेक माजी नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते हे सत्ताधारी पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. त्यातच आता सोलापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आपली ताकद वाढविण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. सोलापुरात अल्पसंख्यांक युवक अध्यक्ष नजीब शेख यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा देत काँग्रेस पक्ष सोडला होता. त्यानंतर बरेच दिवस ते वेट अँड वॉच मध्ये दिसून आले. दरम्यान अचानक त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबतच काँग्रेसमधील अनेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटचलीवर आकर्षित होऊन सोलापूर शहरातील काँग्रेस पक्षाचे माजी सभागृह नेते हाजी मगबूल मोहळकर, माजी नगरसेवक सिद्धेश्वर आळंदकर, काँग्रेसचे माजी परिवहन सभापती सलिम पामा, काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक युवक अध्यक्ष नजीब शेख, न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष भारत साबळे, मगबुल मोहळकर यांचे चिरंजीव ॲड. ताजुदीन मोहळकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी मुंबई येथील महाराष्ट्र महीला विकास मंडळ सभागृहात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे.
याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार ईद्रीसभाई नाईकवाडी, प्रदेश सरचिटणीस लतीफभाई तांबोळी, जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जेष्ठ नेते चंद्रकांत दायमा यांची उपस्थिती होती.
पुण्यातील नेत्यांचाही राष्ट्रवादीत प्रवेश
पुणे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष जालिंदर कामठे आणि शरद पवार गटाचे नेते, जिल्हा भूविकास बँकेचे माजी संचालक मुरलीधर निंबाळकर, काँग्रेस पक्षाचे नेते रोहन सुरवसे पाटील, शरद पवार गटाच्या नेत्या स्वाती चिटणीस यासह अनेक नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातील पक्ष कार्यालयात पक्ष प्रवेश झाला आहे. तर या पक्ष प्रवेशामुळे अजित पवार यांनी भाजप आणि शरद पवार गटाला धक्का दिला आहे.