सौजन्य - नवराष्ट्र टीम
पिंपरी : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपींचा अतिरिक्त तपास करण्यासाठी आता एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी परिमंडळ 2 पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली आहे. या कटाच्या मागे नेमकं कोण आहे? याचा शोध घेण्यासाठी शासनाकडून एसआयटीची नियुक्ती करण्यात आली आहे.
26 जुलै 2023 रोजी तळेगाव दाभाडे परिसरात एक कारवाई करण्यात आली होती या कारवाईच्या दरम्यान सात सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आले होती त्यांच्याकडून तब्बल 9 पिस्तूल 42 काडतुसे, धारदार कोयते जप्त करण्यात आले होते. यातील आरोपी हे पुणे जालना आणि मध्य प्रदेश येथील गुन्हेगार होते. तपासा दरम्यान ते आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट रचत असल्याचे स्पष्ट झाले होते, याबाबत आमदार सुनील शेळके यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये 4 जुलै रोजी लक्षवेधी उपस्थित करत या गंभीर विषयावर चर्चा करण्याची व तपास पथक स्थापन करण्याची मागणी केली होती. त्यावेळी राज्याचे गृहराज्यमंत्री यांनी या बाबीची सखोल चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले होते. त्यानंतर हे विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड झोन दोन चे उपायुक्त विशाल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे, तळेगाव दाभाडे पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात, गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, पोलीस उप निरीक्षक रवींद्र खामगळ, पोलीस हवालदार अंकुश लांडे, पोलीस हवा. सचिन बेंबाळे, पोलीस हवालदार सुनील सगर यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
याविषयी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले, या घटनेच्या अनुषंगाने माझ्याकडे जी माहिती उपलब्ध आहे. ती सर्व माहिती या समितीला मी देणार आहे. समितीने या सर्व प्रकरणाचा सखोल तपास करावा व याच्या मुळाशी कोण आहे त्याचा शोध घ्यावा असे सांगितले. तसेच तळेगाव परिसरामध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारीवर देखील रोख लावण्यासाठी कठोर अशी पावले उचलावीत.