
पुन्हा नव्याने रंगले नाट्यदालन, नव्या निर्मितींचा वर्षाव, प्रेक्षकांच्या उत्साही प्रतिसादाने रंगभूमी उजळली
पुणे/प्रगती करंबेळकर : गेल्या काही महिन्यांपासून थोडासा मंदावलेला व्यावसायिक नाटकांचा प्रवास आता पुन्हा नव्या जोमाने सुरू झाला आहे. दिवाळीनंतरचे आनंदी वातावरण, सणानंतर वाढलेला प्रेक्षकांचा ओढा आणि नव्या निर्मितींची मालिका यामुळे शहरातील नाट्यसंस्कृती पुन्हा एकदा उजळली आहे. गेल्या महिनाभरात अनेक नवीन नाटकांची निर्मिती झाली असून, रंगमंचांवर सतत प्रयोगांची रेलचेल दिसू लागली आहे. मराठी रंगभूमी दिनाच्या आठवड्याच्या निमित्ताने तर नाट्यगृहांत उत्साहाचा उत्सवच पाहायला मिळाला.
या नव्या नाटकांमध्ये केवळ करमणुकीचा आविष्कार नाही, तर सामाजिक वास्तव, नातेसंबंधांची गुंतागुंत आणि आजच्या काळातील माणसाचे बदलते स्वरूप यांचे सूक्ष्म चित्रण दिसते. नात्यांतील भावनिक अंतर, शहरातील ताणतणावपूर्ण जीवनशैली, सामाजिक माध्यमांमुळे बदललेली संवादसंस्कृती या विषयांना नवे रंग आणि अभिव्यक्ती मिळाली आहे. त्यामुळे केवळ पारंपरिक विनोदी किंवा कौटुंबिक धाटणीच्या नाटकांपुरता मर्यादित राहिलेला रंगभूमीचा पट आता अधिक विचारप्रवृत्त आणि वास्तवाशी निगडित झाला आहे.
प्रयोगांच्या वाढत्या संख्येसह नाट्यगृहांचे आरक्षणही झपाट्याने वाढले आहे. बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, विठ्ठल तुपे नाट्यगृह आणि आण्णा भाऊ साठे नाट्यगृह यांसारख्या प्रमुख सभागृहांमध्ये आठवड्याच्या शेवटी प्रयोगांची गर्दी उसळते आहे. काही नाट्यसंस्था शहराच्या उपनगरांपासून मध्यवर्ती भागापर्यंत दौरेही आयोजित करत आहेत, ज्यामुळे नव्या प्रेक्षकवर्गाची निर्मिती होत आहे. रसिक आणि निर्माते दोघेही या नव्या हंगामाने उत्साहित झाले असून, मराठी नाटकाचा सुवर्णकाळ पुन्हा उजाडेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
पुण्यात अंदाजे ३० ते ३५ नाट्य संस्थांकडून नाट्यनिर्मिती
प्रायोगिक नाटकांची चळवळ आता केवळ मुंबई किंवा पुण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. आता ही चळवळ महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत विस्तारत आहे. विविध ठिकाणी प्रायोगिक नाटकांचे प्रेक्षक तयार झाले असून, त्यामुळे नाट्यनिर्मितीचे प्रमाणही लक्षणीय वाढले आहे. सध्या पुण्यात सुमारे ३० ते ३५ नाट्य संस्था सक्रियपणे प्रायोगिक नाटकांची निर्मिती करत आहेत. सामाजिक, मानसिक आणि सांस्कृतिक विषयांवर भाष्य करणारी, विचार करायला लावणारी आणि प्रयोगशील मांडणी असलेली ही नाटके रसिकांच्या पसंतीस उतरली आहेत. तरुण कलाकारांच्या जोशपूर्ण अभिनयाने आणि नव्या दिग्दर्शकांच्या कल्पकतेने या नाटकांना एक नवा आयाम प्राप्त झाला आहे. नाटकाचा आशय थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने अनेक संस्था गावोगावी, शाळा-कॉलेजांमध्ये आणि सांस्कृतिक केंद्रांमध्ये प्रयोग सादर करत आहेत.
मराठी रंगभूमी दिनाच्या आठवड्यात झालेली नाटकं
५ नोव्हेंबरला मराठी रंगभूमी दिन साजरा झाला असून या आठवड्यात जवळजवळ १५ ते २० नाटकांचे प्रयोग झाले. यात ऑल दि बेस्ट, पत्रा पत्री, अलबत्या गलबत्या, वरवरचे वधू वर, नियम व अटी लागू, सखाराम बाईंडर, एका लग्नाची पुढची गोष्ट, दोन वाजून बावीस मिनिटांनी, संगीत देवबाभळी, सूर्याची पिल्ले, भूमिका, ३८ कृष्ण व्हीला या नाटकांच्या प्रयोगांनी पुण्याची रंगभूमी गजबजली. या नाटकांनी विविध विषय, शैली आणि सादरीकरणाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन तर केलेच, पण विचार करायलाही भाग पाडले.
रंगभूमी दिनाच्या या आठवड्यात अनेक नाटकांची निर्मिती आणि प्रयोगही झाले. या आठवड्यात कार्यक्रमांची रेलचेल होती परंतु नाट्यगृह ही रंगभूमीसाठी आहेत यामुळे जास्तीत जास्त नाटकांचे प्रयोग व्हावे हाच आमचा हेतू आहे . – राजेश कामठे, नाट्यगृह व्यवस्थापक पुणे महानगरपालिका