
भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच, हवेली तालुक्यात ताकद वाढली; शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश
या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार राहुल कुल, आणि पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते सर्व नव्याने सामील झालेल्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश पार पडला.
चित्तरंजन गायकवाड यांच्या सामाजिक आणि संघटनात्मक कार्यामुळे या घरवापसीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पक्षातील नेत्यांनी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हवेली तालुक्यात पक्षविस्ताराला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी पंचायत समिती सदस्य गौरी गायकवाड, उपसरपंच नासिरखान पठाण, ग्रामपंचायत सदस्य आकाश काळभोर, कोमल काळभोर, सिमिता लोंढे, बिना काळभोर, राजश्री काळभोर आदींसह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता.
पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करू
या प्रसंगी बोलताना चित्तरंजन गायकवाड म्हणाले, “भाजपाच्या विकासाभिमुख विचारधारेवर माझा पूर्ण विश्वास आहे. हवेली तालुक्यात पक्षाला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी सर्व सहकाऱ्यांसह एकजुटीने काम करू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटले की, “संघटन बांधणीची हवेलीतील परंपरा कौतुकास्पद आहे. या घरवापसीमुळे पक्षविस्ताराला नवी दिशा मिळेल.
”तर आमदार राहुल कुल यांनी या प्रवेशाला “भाजपासाठी नवा उर्जा स्रोत” असे संबोधले. या कार्यक्रमास मुंबई आणि पुणे जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली. घोषणांनी दुमदुमलेल्या या सोहळ्याने हवेली तालुक्यातील भाजप संघटनेला नवसंजीवनी मिळाल्याचे स्पष्ट झाले.