
कोल्हापुरात उद्या अनेक शाळांना सुट्टी जाहीर; कारण नेमकं काय?
कोल्हापूर : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची घोषणा झाली. त्यानुसार, कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कामकाजाकरिता ज्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील कार्यरत सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्या शाळांना शुक्रवारी (दि.६) सुट्टी जाहीर केली आहे.
तसेच ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूक कामकाजासाठी नियुक्ती केली नाही. त्या शाळा शुक्रवारी (दि.६) सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत सुरू राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान होणाऱ्या क्षेत्रातील सर्व शाळांना शनिवार (दि.७) सुट्टी राहणार आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या माध्यमिक व प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची मतदान पथकात नियुक्ती केली आहे. त्यांनी शुक्रवारी (दि.६) सकाळी नऊ वाजल्यापासून संबंधित तालुका स्तरावरुन निवडणूक साहित्य ताब्यात घेऊन नियुक्त केलेल्या मतदान केंद्रावर हजर राहावे, असे आदेश दिले आहेत.
दरम्यान, राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यासाठी निवडणूक घेतली जाणार आहे. यासाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे गेल्या 20 दिवसांपासून सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरू आहे. आता या निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा गुरुवारी (दि.५) रोजी संपणार आहे तर ७ फेब्रुवारी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आज प्रचार संपत असल्याने राजकीय पक्ष आणि उमेदवारांची चांगलीच धावपळ वाढताना दिसत आहे.
घरबसल्या शोधता येणार मतदारयादीतील नाव
जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठीच्या मतदार यादीतील मतदाराचे नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी ‘मताधिकार’ मोबाईल अॅप उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. हे अॅप ‘गुगल प्ले स्टोअर’वरून डाऊनलोड करता येईल. अॅपमध्ये मतदाराचे नाव शोधण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत.
मतदान केंद्राचीही मिळू शकणार माहिती
मतदाराचे संपूर्ण नाव किंवा मतदार ओळखपत्राचा क्रमांक नमूद करून मतदार यादीतील नाव शोधता येते. यातून आपले मतदान केंद्रही कळू शकेल. याशिवाय मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी https://mahasecvoterlist.in/ हे संकेतस्थळदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यात मोबाईल अॅपप्रमाणेच ‘नाव’ किंवा ‘मतदार ओळखपत्रा’चा क्रमांक नमूद करुन नाव शोधता येईल.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : राज्यातील 32 जिल्हा परिषदांसह 336 पंचायत समितीच्या निवडणुका आज जाहीर होण्याची शक्यता