राज्यातील 32 जिल्हा परिषदांसह 336 पंचायत समितीच्या निवडणुका आज जाहीर होण्याची शक्यता
मुंबई : राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकीचे वातावरण आहे. त्यातच राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा धुरळा लवकरच उडणार आहे. चालू आठवड्यातच दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या सर्व निवडणुकांच्या घोषणा आज केल्या जातील, असे सांगण्यात येत आहे.
राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकांसाठी पुढच्या महिन्यात ७ फेब्रुवारी रोजी मतदान होण्याची शक्यता आहे. निवडणुकांची घोषणा बुधवारी (दि.७) होण्याची शक्यता आहे. राज्यात ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकांची तयारी राज्य निवडणूक आयोगाककडून केली जात आहे. यातील १७ जिल्हा परिषदा आणि ८८ पंचायत ५० समित्यांमध्ये टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मर्यादेमध्ये असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत.
हेदेखील वाचा : Prithviraj Chavan News: डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान मोदींचे अपहरण करतील? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपर्यंत घेण्यात याव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. पण आरक्षणाच्या पेचामुळे जिल्हा परिषद निवडणुकीवर परिणाम झाला आहे. या आरक्षणामुळेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यास उशिर होत आहे. पण आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. ७ फेब्रुवारी रोजी यासाठी मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आयोगाच्या बैठकीत होणार मंथन
निवडणूक आयोगाने बुधवारी प्रशासनाची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. यात मनपा निवडणुकांची मतमोजणी, निर्माण होणारी कायदा व सुव्यवस्थेची स्थिती तसेच जिल्हा परिषद निवडणुकांच्या संभाव्य तारखांवर चर्चा होणार आहे. मनपाची रणधुमाळी आटोपताच जिल्हा परिषद निवडणुका घेणे शक्य आहे का, यावर अधिकाऱ्यांची स्पष्ट भूमिका या बैठकीत जाणून घेतली जाण्याची शक्यता आहे.
राज्यात अपुरे मनुष्यबळ
प्रशासनापुढे मनुष्यबळाचा प्रश्न असल्याने जिल्हा परिषद निवडणुका फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात घेण्याची मुभा देण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला करण्याबाबत चर्चा सुरू आहे. सध्या महानगरपालिका निवडणुका सुरू असून, त्यासाठी मोठे अधिकारी व कर्मचारी बळ तैनात आहे.






