मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित भाजपवर टीका
जालना : राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरु केले होते. त्यावर भाजप नेते प्रसाद लाड व प्रवीण दरेकर यांनी टीका केली होती. आता मात्र जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण स्थगित केले असेल तरी त्यांनी भाजप नेत्यांवर जहरी टीका केली आहे. उपोषण मागे घेताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच राज्य सरकारला 13 ऑगस्ट हा नवीन अल्टीमेटम दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी प्रवीण दरेकर यांच्यावर वैयक्तिक टीका केली आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करताना देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि भाजपवर जहरी टीका केली आहे. जरांगे पाटील म्हणाले, “देवेंद्र फडणवीस हे प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना समोर करून काड्या करत आहेत. दरेकरने कपाळावर कुंकू लावले तर, अतिशय सुंदर दिसेल, सखू सारखा दिसेल” अशी पातळी सोडून वैयक्तिक टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. “सरकारकडून कोणी आले नाही, कारण सरकारकडे मंत्री उरले नाहीत. अनेक जण आले, आता पुन्हा कोणत्या तोंडाने जायचे हा विषय असेल. समाजाच्या दबावामुळे मी सलाईन घेतले” असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये 2013 च्या नाटकातील पैशांच्या प्रकरणावरुन अटक वॉरंट काढण्यात आले आहे. त्यामुळे मराठा समजाला देखील मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणावर जरांगे पाटील म्हणाले, “पुन्हा अटक वॉरंट का काढले?. न्याय, गृह विभाग फडवणीस यांच्याकडे आहे. हा देवेंद्र फडणवीस यांनी रचलेला डाव आहे. न्यायाधीश हे फडवणीस यांचे नातेवाईक आहेत. या अटक वॉरंट प्रकरणात, उद्धव ठाकरे यांचा हात असू शकतो. नाटकवाला त्यांच्या जवळचा आहे. मला जेल मध्ये टाकून जीवे मारले जाऊ शकते. मी कुठेच अडकत नाही, म्हणून हा कट आहे. मी पैसे दिले होते, त्या मॅटर मध्ये माझा चेक नाही. आम्ही सन्मान करतो म्हणून हुकूमशाही करता का?. नाटकाचे पैसे देण्यासाठी, मी घर विकून पैसे देतो, मी गायरानात राहील. मला वॉरंट आले तरी मी जात नसतो, कोर्टाने पण फडवणीस यांचे ऐकणे सोडावे, असे मनोज जरांगे पाटील यांनी न्यायालयाला देखील म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या या टीकेच्या सूरावरुन त्यांच्याच अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे.