एक मराठा लाख मराठा, मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, म्हणून मुंबई मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु आहे. आज आंदलनाचा पाचवा दिवस असून आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही असं मनोज जरांगे यांनी सरकारला ठणकावून सांगितलं आहे. मुंबई आणि उपनगरात मोठ्या प्रमाणात मराठा समाज आक्रमक होताना दिसत आहेत. अशातच आता एका तरुणाने अजबच निर्धार केला आहे. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कपडे घालणार नाही,असा पण एका तरुणाने केला असून त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मुंबईतील एसी लोकलमधील हा व्हिडीओ असून या व्हिडीओवर देखील नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहे. मराठ्यांना आरक्षण मिळायलाच हवं या मागणीकरीता करण्यात आलेल्या आंदोलनावर समाजातील इतर घटकांनी देखील पाठींबा दिलेला आहे. आझाद मैदान, सीएसएमटी लोकलस्थानक, नवी मुंबई आणि उपनगरात देखील मराठा आंदोलनाने तीव्र स्वरुप धारणं केलेलं आहे.
समाजातील काही घटक या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत तर काही य़ा आंदोलनाला विरोध करताना दिसत आहे. मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलीस प्रशासनाने सखोल नियोजन केले आहे. सीएसएमटी आणि चर्चगेट स्थानकात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करून प्रवासी व आंदोलकांची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना रेल्वे पोलीस स्टेशनमार्गे बाहेर सोडले जात असून आंदोलकांना आझाद मैदानाकडे जाण्यासाठी भुयारी मार्ग देण्यात आला आहे. सीएसएमटी स्थानकातील आंदोलकांना थांबण्यासाठी विशेष रोप बांधून व्यवस्था केली आहे. नियमित प्रवासी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आंदोलकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सीपी राकेश कलासागर यांनी केले.याचपार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे यांनी अतिरेक करणाऱ्या आंदोलकांचा चांगलाच समाचार घेतला. गोष्टी संयमाने घ्या नाहीतर तुम्ही आमच्यातले नाही असं समजलं जाईल, असं देखील जरांगे पाटील यांनी आंदोलकांना ठणकावून सांगितलं आहे.
आंदोलनाच्या नावाखाली प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या आंदोलकांवर जरांगे पाटील चांगलेच भडकले. याचबरोबर त्यांनी सत्ताधारी सरकारचाही चांगलाच समाचार घेतला आहे. जरांगे पाटील म्हणाले की, गेले चार वर्ष आम्ही आमचा हक्क मागतोय आम्हाला मुंबईत यायची हौैस नाही. पोरं हुल्लडबाजी करतायत ते दिसतं पण सरकार गेली कित्येक दिवस हुल्लडबाजी करत आहेत ते दिसत नाही का ? या सरकारला आम्ही 2 वर्षांचा वेळ दिला मात्र हाती निराशाच आली. त्यामुळे आता जोपर्यंत आमच्या मागण्य़ा मान्य होत नाही तोवर आम्ही मुंबई सोडणार नाही असा इशाराच जरांगे पाटलांनी दिला आहे.