मुंबईमध्ये मराठी गुजराती (Marathi Vs Gujrati) वाद वाढण्याची शक्यता आहे. नुकतीच लिंक्डिनवर नोकरीसाठी एका जाहिरात टाकण्यात आली होती. या जाहिरातीमध्ये मराठी लोकांनी नोकरीसाठी अर्ज करू नये, असे सांगण्यात आले होते. मात्र सोशल मीडियावर ही जाहिरात प्रसिद्ध होताच मोठा गोंधळ निर्माण झाला. महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला नोकरी मिळणार नाही? असे अनेक प्रश्न यावर उपस्थित करण्यात आले. प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातींवरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. यावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
मुंबईमधील मराठी माणसाचा सध्या आत्मविश्वास वाढला आहे. कारण त्यांना माहित आहे की, इथे असलेले राजकारणी आपल्या पाठीशी आहेत. याच आत्मविश्वासातून दक्षिण मुंबईत मराठी माणसांना नोकरी नाकारण्यात आल्याचा प्रकार घडला. ही घटना दुर्दैवी आहे. वरून आदेश आल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व उद्योग गुजरातमध्ये जातात. त्यामुळे गुजराती नेत्यांचा अहंकार वाढला आहे. यामुळेच गुजराती कंपन्यांमध्ये मराठी माणसाला नोकरी नाकारली जात आहे. हे असेच होत राहिले तर मराठी माणसाची ताकद दाखवून द्यावी लागेल, असे म्हणत रोहित पवारांनी आपले मत व्यक्त केले आहे.
कंपनीकडून सोशल मीडिया पोस्ट डिलीट
मुंबईमधील गिरगाव हे मराठी माणसाच्या संस्कृतीचा केंद्र स्थान आहेत. मात्र गिरगावातील एका कंपनीकडून नोकरीसाठी लिंक्डिनवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये असे लिहिले होते की, मराठी उमेदवारांनी नोकरीसाठी अर्ज करून नये.त्यानंतर ही जाहिरात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होऊ लागली. या जाहिरातीवर मराठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये मुंबईमध्ये ग्राफिक्स डिझाईनरच्या नोकरीसंदर्भात पोस्ट टाकण्यात आली होती. यावर एचआर जान्हवी सराना हिचे नाव होते. त्यानंतर हा सर्व प्रकार कंपनीला समजल्यावर सोशल मीडियावरील पोस्ट डिलीट करून एचआर जान्हवी सराना हिने माफी मागितली.
गुजराती सोसायटीमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना प्रवेशबंदी
एक दिवसांपूर्वी घडलेल्या प्रकारानंतर लगेच रविवारी संध्याकाळच्या सुमारास ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना घाटकोपरमधील गुजराती रहिवाशांनी सोसायटीमध्ये येण्यास नकार दिला. सतत घडत असलेल्या या प्रकारांमुळे नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. या प्रकारावर ठाकरे गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. तर आगामी काळात मराठी गुजराती वाढ वाढण्याची शक्यता आहे.