
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी औद्योगिक परिसर शनिवारी (दि. २० जुलै) पुन्हा एकदा भयंकर स्फोटाने हादरला. विनंती केमिकल कंपनीत दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या स्फोटात समीर खेडेकर (वय अंदाजे ३५, रा. घाणेखुठ, लोटे) या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे. समीर खेडेकर हे विनंती केमिकल कंपनीत बॉयलर ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. स्फोटानंतर त्यांना तातडीने चिपळूण येथील लाइफ केअर रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र गंभीर जखमी अवस्थेत असताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. ही घटना समजताच त्यांचे कुटुंबीय, सहकारी व परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.
स्फोटाचा आवाज इतका तीव्र होता की आसपासच्या अनेक कंपन्यांच्या इमारती हादरल्या. स्थानिक नागरिकांनीही तो आवाज ऐकून घाबरून बाहेर धाव घेतली. सुरुवातीच्या माहितीनुसार, कंपनीतील बॉयलरमध्ये अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा स्फोट झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. यासंबंधी सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
या स्फोटात इतर काही कामगारही जखमी झाले असून, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कंपनीच्या इमारतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यंत्रसामग्रीही पूर्णतः नादुरुस्त झाली आहे. कंपनी प्रशासनाकडून घटनेच्या तपशीलवार माहितीची प्रतीक्षा आहे. सदर स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. स्फोटावर नियंत्रण मिळवल्यानंतर बचावकार्य राबवण्यात आले. परिसरातील इतर उद्योगधंदे आणि नागरिकांनी सावधगिरी म्हणून काही काळ काम थांबवले होते.
औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने लोटे एमआयडीसी परिसरात वारंवार अशा घटना घडत असल्यामुळे कामगार आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या दुर्घटनेची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.