चिपळूण : गेल्या तीन दिवसांपासून येथे पावसाचा पुन्हा जोर वाढल्याने मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात धोका आणखी वाढला आहे. यावर ताप्तुरती उपाययोजना म्हणून दरडीकडील मार्ग पुर्णपणे बंद करून दुसऱ्या बाजूने एकेरी वाहतूक सुरू ठेवली आहे. त्याशिवाय गॅबीयन वॉलचा भराव वाहून जात असल्याने तेथे प्लास्टीकचे अच्छादन केले आहे. परंतू वाढत्या पावसामुळे दुरूस्तीच्या उपाययोजना करण्यात अडथळा निर्माण झाला असून पावसाचा जोर कमी होताच दुरूस्तीला चालना मिळणार आहे.
परशुराम घाटातील चौपदरकीरण या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहिले आहे. सुरवातीला कुळ, खोत व देवस्थानच्या मोबदल्यावरून परशुराम नेहमी चर्चेत राहिला. त्यानंतर परशुराम घाटाच्या डोंगर माथ्यावर व पायथ्याशी असलेल्या वस्तीचा सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला. परंतू आता हे सर्व बाजूला राहिले असून परशुराम घाटातील धोकादायक स्थितीत असलेला रस्ता दुरूस्तीचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाने हाती घेतला आहे.
पावसाळ्यापुर्वी घाटातील अतिशय धोकादायक असलेल्या ठिकाणी कॉक्रिटीकरणाला जागोजागी तडे गेले होते. तसेच काही ठिकाणी रस्ताही खचला होता. त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ठेकेदार कंपनी व राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून प्रयत्न सुरू असतानाच काही महिंन्यापुर्वी अचानक रस्त्याचा मोठा भाग खचला आणि त्या ठिकाणची सरंक्षक भिंतही कोसळली. तेव्हापासून आजतागायत परशुराम घाटात एकेरी वाहतूक केली जात आहे. खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी गॅबीयन वॉल उभारली जात होती. तसेच पायथ्यालगत डबर व सिमेंटच्या आधारे मजबूतीकरण केले जात होते.
हे काम सुरू असताना मे महिन्यात झालेल्या पहिल्याच पावसात नव्याने उभारलेली गॅबीयन वॉल खचली. त्यानंतर काही दिवसातच या गॅबीयन वॉलचा काही भाग भरावासह वाहून गेल्याने या मार्गावरील धोका आणखी वाढला. परशुराम घाटात आतापर्यत अनेकदा दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर अधूनमधून भराव वाहून जाणे, सरंक्षक भित व कॉक्रिटीकरणाला तडे जाणे, दरडीची माती घसरणे, रस्त्यावर दगड येण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यासाठी डोंगरावर लोखंडी जाळी बसवण्याचे काम भर पावसातही सुरूच आहे.
परंतू या घाटातील दरडीकडील मार्ग अतिशय धोकादायक बनल्याने याठिकाणी बॅरिकेटस उभारून एकेरी वाहतूक सुरू ठेवली आहे. त्यामुळे काही वेळा याठिकाणी वाहतूक कोंडीचे प्रकारही घडत आहेत. विशेषतः अवजड वाहतूकीमुळे वाहतूक कोंडीत जास्त भर पडत आहे. अतिवृष्टीच्यावेळी अवजड वाहतूक सकाळ व संध्याकाळच्या सत्रात बंद ठेवावी अशी मागणी होत आहे.
परशुराम घाटात पावसामुळे गॅबीयन वॉलच्या दुरूस्तीच्या कामात अडथळा येत आहे. पावसाचा जोर कमी झाल्यानंतरच या कामाला चालना मिळेल. घाटातील पाण्याचा व्यवस्थीत निचरा होण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले जात आहेत. स्टेपिंग पद्धतीने पाण्याचा निचरा झाल्यानंतर भराव, अथवा दरडी घसरण्याचे प्रकार घडणार नाहीत, असं शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग पंकज गोसावी यांनी सांगितलं आहे.