
माथेरान/संतोष पेरणे :या पर्यटन स्थळी दिवाळी हंगाम हा वर्षातील पर्यटन हंगामातील महत्वाचा हंगाम समजला जातो. या पर्यटन हंगामाला सुरुवात झाली असून माथेरान मधील मागील दीड महिना थंड असलेला पर्यटन हंगाम पुन्हा जोरात सुरू झाला आहे.मात्र नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेन सुरू झाली नसल्याने पर्यटक नाराजी व्यक्त करीत आहेत.दरम्यान मिनी ट्रेन मार्गातील बहुसंख्य दुरुस्तीची कामे पूर्ण होत आल्याने याच पर्यटन हंगाम मिनी ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे.
पर्यटकांचे खास आकर्षण असलेल्या माथेरान चा दिवाळी पर्यटन हंगाम सुरु झाला आहे.शाळा कॉलेज बंद असल्याने दिवाळीची सुट्टी पडताच मुंबई पुण्यापासुन अगदी जवळचे आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यातील सुंदर थंड हवेचे डेस्टीनेशन माथेरान सध्या पर्यटकांच्या वर्दळीने बहर घेत आहे.अधिच लांबलेल्या पावसाने दिवाळीच्या पहील्या दिवशीच विश्रांती घेतल्याने येथील परीसर हा विपुल वृक्षांनी सजलेला असताना हिरवीगार वनराई पर्यटकांना साद घालत असून पर्यटक ही त्या हाकेला सकारात्मक प्रतिसाद देताना दिसत आहे.दीपावली मध्ये हळू हळू पर्यटक येऊ लागल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.व या निसर्गात पर्यटक मश्गूल होताना दिसत आहेत.
या दिवाळीत अनेक पर्यटकांचे पाय जवळच्या पर्यटस्थळावर म्हणजेच निसर्गाने नटलेल्या माथेरानकडे वळत आहेत. माथेरान मध्ये वेगवेगळी ३८ प्रेक्षणियस्थळे आहेत. आरोग्यदायक व उत्साहवर्धक हवामान, अतुलनिय निसर्ग सौंदर्य व जोडीला थंड हवा यामुळे माथेरानला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.येथील चिक्की , मध, घोड्याची रपेट हात रिक्षा सवारी प्रेक्षणीय स्थळावरील मनोरंजनासाठी गेम्सची मजा, गोळा,मका मॅगी आशा अनेक खाद्य पदार्थाची लज्जत येथे पर्यटकांना घेता येत असते. माथेरान मधील महत्वाचे आकर्षण असलेली माथेरानची राणी म्हणजे मिनी ट्रेन पावसाळ्यात बंद असते आणि ऑक्टोबर महिन्यात सुरू होते.मात्र यावर्षी मिनी ट्रेन मार्गावर मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने मिनी ट्रेन अद्याप सुरू झालेली नाही.त्यामुळे मध्य रेल्वे ने प्रवास करून आलेले पर्यटक प्रवासी नाराज आहेत.मात्र दस्तुरी नाका येथे पर्यटकांच्या दिमतीला मिनी ट्रेन ची शटल सेवा आल्याने पर्यटक समाधानी आहेत.तर अनेक पर्यटक हे निसर्गाच्या सानिध्यात पायी चालण्याचा आनंद काही औरच असला तरी मिनी ट्रेनची सफर करण्यासाठी माथेरान ला भेटू देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे.