
पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता सुटणार? 'या' उपाययोजना राबवल्या जाणार
पुणे : शहरातील वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिस प्रयत्न करताना दिसत आहे. तरीदेखील हे चित्र बदलत नसल्याचे समोर आले आहे. काही प्रमाणात वाहतूक वेग वाढला असला तरी आयटी पार्क आणि नगर रोड अशा विमाननगर भागात काही दिवसांपासून वाहतूक कोंडीच्या अनेक तक्रारी येत असल्याचा पार्श्वभूमीवर थेट पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी रात्रीच्यावेळी येथील वाहतुकीचा आढावा घेतला.
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक विभागाचे उपायुक्त हिम्मत जाधव व अधिकारी उपस्थित होते. शहरातील वाहतूक कोंडी काही कमी होताना दिसत नाही. शहराचा विस्तार चारही बाजूने होत आहे. तसेच मेट्रो व इतर कामे देखील सुरू आहेत. त्यामुळे आणखीनच या वाहतूक कोंडीत भर पडत आहे. पोलिसांनी पहिल्या टप्प्यात नगर रोड नंतर सोलापूर रोड वाहतूक कोंडी मुक्त करण्याचे प्रयत्न केले. नंतर शहरातील महत्वाचे १५ रस्ते देखील केंद्रीत करून तिथे आवश्यक उपाययोजना केल्या. त्याला काही प्रमाणात यश आले. वाहतुकीचा वेग वाढल्याचा दावा देखील केला. यासोबतच आता इतरही वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवत आहे.
हेदेखील वाचा : Pune Crime: धक्कादायक!अनैतिक संबंधाच्या संशयातून चुलत भावाची सुपारी देऊन हत्या; पुण्यातील प्रकरण
दरम्यान, महत्त्वाचा परिसर असलेल्या विमाननगर भागात काही दिवसांपासून वाहतूक कोंडीच्या तक्रारी पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाला येत असल्याने नवीन उपाययोजना राबवण्याचा प्रयत्न सुरू केले आहेत. वारंवार येणाऱ्या तक्रारींची दखल घेत थेट पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गर्दी होणाऱ्या वेळेत याठिकाणी जाऊन पाहणी केली. तसेच या भागाचा आढावा घेतला. त्यांनी काही उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले. तर काही वाहतूक बदलही करण्याचे सूचित केले. त्यानुसार अनेक मुख्य रस्त्यांवर एकेरी वाहतूक जाहीर करण्यात आली आहे.
एकेरी वाहतूक घोषित रस्ते
– श्रीकृष्ण हॉटेल चौक → दत्तमंदिर चौक → सीसीडी चौक – गंगापुरम चौक → कैलास सुपर मार्केट चौक → गणपती मंदिर चौक
दुतर्फा वाहतूक सुरू राहणारे मार्ग
सीसीडी चौक → गंगापुरम चौक, दत्तमंदिर चौक → कैलास सुपर मार्केट चौक, गणपती मंदिर चौक → श्रीकृष्ण हॉटेल चौक
हेदेखील वाचा : Dnyaneshwar Katke Accident: आमदार ज्ञानेश्वर कटकेंच्या भरधाव कारने बालिकेला उडवले; प्रकृती गंभीर