भाईंदर/ विजय काते : मीरा-भाईंदर शहरातील एकमेव शिल्लक नैसर्गिक ऑक्सिजन स्रोत, जैवविविधतेचा आश्रयस्थान, हजारो पक्षी-प्राण्यांचे निवासस्थान, डोंगरीचा डोंगर आणि परिसर कारशेडसाठी नष्ट करण्याच्या हालचालींविरोधात रविवारी तब्बल ६ हजारांहून अधिक नागरिकांनी मानवी साखळी करून शांततामय आंदोलन छेडले. “डोंगर वाचवा, जंगल वाचवा, ऑक्सिजन वाचवा” अशा घोषणा देत ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी, मच्छीमार, शेतकरी, महिलांनी काळे झेंडे, निषेध फलक घेत निषेध व्यक्त केला. या आंदोलनात डोंगरी, चौक, पाली, उत्तन, तारोडी, भाईंदर, गोराई, मनोरी परिसरातील गावकरी, स्थानिक संस्था, विविध पक्षांचे नेते व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
एमएमआरडीएने मेट्रो ९ आणि मेट्रो ७ए साठी डोंगरीच्या डोंगरावर ७० हेक्टर जागा कारशेडसाठी निश्चित केली असून हा निर्णय पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत घातक ठरणार असल्याचा इशारा नागरिक देत आहेत.प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार सुमारे १२,४०० झाडे तोडली जाणार असली तरी प्रत्यक्षात ती संख्या १५ ते १८ हजारांवर जाण्याची शक्यता आहे. झाडांचे वय आणि संख्येविषयी चुकीची माहिती देऊन झाडांची अवैध कत्तल सुरू असल्याचा आरोप होत आहे. डोंगर तोडण्यासाठी स्फोटकांचा वापर होणार असून त्यामुळे जैवविविधतेला मोठा धोका निर्माण होणार आहे.
या आंदोलनात शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या आई ज्योती राणे स्वतः सहभागी झाल्या होत्या. त्यांनी सरकारला आवाहन केले की, “विकास हवा, पण तो निसर्ग नष्ट करून नको. आमच्या मुलांचे भविष्य आणि श्वास हिरावू नका.”स्थानिकांनी पारंपरिक वेषात सहभाग नोंदवत आपल्या जीवनशैलीचा पर्यावरणाशी असलेला संबंध अधोरेखित केला. अनेकांनी काचेच्या बरण्यांमध्ये झाडे ठेवून “हेच आमचं भविष्य असेल का?” असा सवाल उपस्थित केला. लहान मुलांनी ‘वृक्ष वाचवा, जीवन वाचवा’, ‘ऑक्सिजन नाही, तर भविष्य नाही’ अशा फलकांद्वारे लक्ष वेधले.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सुभाषचंद्र बोस मेट्रो स्थानकाच्या आसपास मुबलक मोकळी जागा असूनही सुमारे ७ ते ८ किमी लांब डोंगराळ भागात कारशेड का लादला जात आहे, हा मोठा प्रश्न आहे.२०२२ च्या विधिमंडळ अधिवेशनात खुद्द नगरविकास मंत्र्यांनी “तांत्रिकदृष्ट्या डोंगरावर कारशेड शक्य नाही” असे विधानसभेत लेखी उत्तर दिले होते. तरीही आता तिथेच कारशेड करण्याचा हट्ट का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
धावगी डोंगरावर बेकायदेशीर कचरा डंपिंगमुळे परिसरातील शेती नष्ट झाली असून आग, धूर, दुर्गंधी यामुळे ग्रामस्थांचे जीवन आधीच नारकीय झाले आहे. डोंगरीचा डोंगर ही एकमेव हरित ढाल होती, तीही नष्ट झाली तर आरोग्यावर आणि जगण्यावर गंभीर परिणाम होतील, असे मत आंदोलक व्यक्त करत आहेत.
डोंगरी कारशेडविरोधातील चळवळ आता केवळ स्थानिक मर्यादेत राहिलेली नाही. रविवारी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील २१ ठिकाणी आंदोलन करण्यात आले. त्यामुळे हे आंदोलन आता राज्यव्यापी रूप घेण्याच्या मार्गावर आहे.
प्रमुख मागण्या
1. कारशेडसाठी पर्यायी जागेचा विचार करावा.
2. झाडांची तातडीने होणारी कत्तल थांबवावी.
3. जैवविविधतेचा विनाश थांबवावा.
4. डोंगरी परिसरात होणारा प्रकल्प रद्द करावा.
5. लोकांचा विश्वास संपादन केल्याशिवाय कोणताही प्रकल्प पुढे नेऊ नये.
डोंगरी परिसरातील ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे – “सरकारने जर या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर हे आंदोलन आणखी तीव्र, व्यापक आणि निर्णायक होईल.या प्रश्नाकडे शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून सकारात्मक प्रतिसाद दिला जातो का, हे येणाऱ्या दिवसांत स्पष्ट होईल, असं सांगण्यात आलं आहे.