Minister Aditi Tatkare information on the of Mukhyamantri Ladki Bahin yojana form rejection
रत्नागिरी : महायुती सरकारकडून निवडणुकीच्या पूर्वी 2024 च्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अल्पावधीमध्ये लोकप्रिय झाली. या योजनेवरुन आता निकालानंतर जोरदार राजकारण रंगले आहे. महायुतीने प्रचारामध्ये देखील योजनेचा जोरदार प्रचार केला. त्यानंतर महायुती सरकार आल्यानंतर 2100 रुपये देण्याचे आश्वासन देखील देण्यात आले. मात्र आता निकालानंतर आता लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी सुरु करण्यात आली आहे. यामध्ये लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात येतील अशी चर्चा सुरु आहे. यावर आता बाल व महिला कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधून स्पष्टीकरण दिले आहे.
लाडकी बहिण योजनेमध्ये निवडणुकीच्यापूर्वी महायुती सरकारने सर्व महिलांना योजनेचा लाभ दिला. मात्र निकालानंतर आता अपात्र महिलांच्या अर्जाची छाननी केली जात आहे. यामध्ये एका बांगलादेशी घुसखोर महिलेने देखील योजनेचा लाभ घेतला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांच्या डोक्यावर अर्ज बाद होण्याची टांगती तलवार आहे. याबाबत आता मंत्री आदिती तटकरे यांनी पूर्ण माहिती दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
लाडकी बहीण योजनेबाबत अनेक गैरसमज पसरवण्यात येत आहेत. ३० लाख अर्ज बाद होण्याच्या मार्गावर आहेत अशी देखील चर्चा आहे., याबाबत मंत्री आदिती तटकरे यांना माध्यमांनी सवाल विचारला. यावर त्या म्हणाल्या की, “मला माहीत नाही हा आकडा कुठून येतो. पण माझी सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की अशा कोणत्याही बातम्या आणि अफवांना बळी पडू नका. २ कोटी ४१ लाख महिलांच्या खात्यात लाभ थेट हस्तांतरण करण्यात आलं आहे.” असे मत मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
पुढे मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, “पहिल्या दिवशी १ कोटी ७ लाख महिलांना लाभ दिला तर काल सुद्धा १ कोटी २५ लाख महिलांना लाभ वितरित झाला आहे. लाभार्थ्यांचं वितरण नेहमीप्रमाणेच सुरू आहे. ऑक्टोबरमध्ये ९ तारखेला २ कोटी ३४ लाख महिलांना लाभ दिला होता. आता लाभ वितरण २ कोटी ४१ लाख महिलांना झालेला आहे. कोणत्याही अफवांना आणि अपप्रचारांना बळी पडू नये”, असे स्पष्ट मत आदिती तटकरे यांनी व्यक्त केले आहे.
महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. याचा मोठा फायदा महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये झाला. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले. पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत सहा हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत, तर जानेवारीचा सातवा हप्ताही पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. नवीन अर्थसंकल्पामध्ये या योजनेंतर्गत दरमहा 2100 रुपये देण्याची तरतूद करण्यात येणार आहे.