
महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप कोणाकोणाला उमेदवारी देणार? चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील हे इचलकरंजीत आले होते. प्रमुख नेतेमंडळी व पदाधिकार्यांच्या चर्चेनंतर त्यानीं पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, निवडणुक लढवू इच्छिणार्यांकडून भाजपा प्रदेशकडून निश्चित केलेला उमेदवारी मागणी अर्ज घेतला जाईल. त्यावर प्रत्येक प्रभागात स्वतंत्र सर्व्हेक्षण करुन विजयी होण्याची क्षमता असलेल्यांना उमेदवारी दिली जाईल. ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यांना शासनाच्या विविध पदांवर आणि स्विकृत सदस्यपदी संधी दिली जाईल. त्यामुळे आमच्यात कोणीही नाराज होणार नाही आणि बंडखोरीही करणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर सन्मानाचे पद दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महायुतीत चर्चेला वेळ न मिळाल्याने नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीवेळी काही ठिकाणी मतभेद निर्माण झाले तसे महापालिका निवडणुकीत होणार नाहीत. महापालिका निवडणुक हाताळण्यासाठी चौघांची समन्वय समिती तयार केली आहे. यामध्ये माजी मंत्री प्रकाश आवाडे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, आमदार राहुल आवाडे आणि पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांचा समावेश आहे. स्थानिक निवडणुकीसंदर्भात आवश्यक तो निर्णय नेत्यांसह आमदार घेतील, असे पाटील यांनी सांगितले.
यावेळी अशोक स्वामी, मिश्रीलाल जाजू, प्रकाश दत्तवाडे, राजवर्धन नाईक-निंबाळकर, सुनिल पाटील, बाळासाहेब माने, शशिकांत मोहिते, तानाजी पोवार, विठ्ठल चोपडे, शहाजी भोसले, अमृत भोसले, शेखर शहा, अलका स्वामी, सपना भिसे, सीमा कमते, नजमा शेख यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.