
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अन् मतदान एकाच दिवशी; परीक्षार्थी संभ्रमात
मात्र, राज्यातील १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे मतदान ७ फेब्रुवारी २०२६ रोजीच होणार असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे जाहीर झालेल्या तीन दिवसांच्या शासकीय दुखवट्यामुळे निवडणूक कार्यक्रमात बदल करण्यात आला. त्यानुसार ५ फेब्रुवारीऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान, तर ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
सीटीईटी परीक्षेला राज्यातून ३ लाख ४७ हजारांहून अधिक उमेदवार बसणार आहेत. यामध्ये पेपर क्रमांक १ (इयत्ता १ ते ५) साठी २ लाख १७ हजारांहून अधिक, तर पेपर क्रमांक २ (इयत्ता ६ ते ८) साठी १ लाख ३० हजारांहून अधिक उमेदवार आहेत. अनेक उमेदवारांना स्वतःच्या जिल्ह्याऐवजी इतर जिल्ह्यात परीक्षा केंद्र देण्यात आले असून, मतदान अन् परीक्षा एकाच दिवशी असल्याने वाहन प्रवास आणि वेळेचे मोठे संकट उभे राहणार आहे.
यापूर्वी शासनाच्या आदेशानुसार २०१० पूर्वी नियुक्त प्राथमिक शिक्षकांना १ सप्टेंबर २०२७ पूर्वी टीईटी/सीटीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. अन्यथा सेवा समाप्तीचे निर्देश आहेत. त्यामुळे ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची असून, मतदानाच्या दिवशीच परीक्षा ठेवल्याने उमेदवारांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सीटीईटी परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात येत आहे.
राज्यात केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आणि मतदान एकाच दिवशी ठेवण्यात येऊ नये. ७ तारखेची परीक्षा ९ तारखेला घ्यावी. जेणेकरुन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये मतदान करण्यास संधी मिळू शकेल. राज्यात हजारो विद्यार्थी परीक्षा केंद्र त्यांना जिल्हा सोडून इतर जिल्ह्यात परीक्षा असल्यामुळे संविधानिक मतदानच्या हक्कापासून वंचित राहू शकतात. यामुळे लाखो परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना परीक्षा की मतदान या संभ्रमात नुकसान होऊ शकेल. वाहनांचीही गैरसोय होऊ शकते. केंद्रीय परीक्षा परिषदेला तसे राज्य सरकारने कळवावे आणि ७ ची सीटीईटी परीक्षा पुढे घ्यावी. -प्रशांत शिरगुर