स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? मंत्री जयकुमार गोरे म्हणाले...
कराड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तात्काळ व्हाव्यात, याठिकाणी काम करणार्यांना संधी मिळून लोकशाही बळकटी बळकट व्हावी, ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही इच्छा आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी तज्ञ वकिलांच्या नेमणुका केल्या असून, तात्काळ निकाल होण्याच्या दृष्टीने ते भूमिका मांडतील. त्यानंतर न्यायालयाने स्थगिती उठवल्यावर तात्काळ निवडणुका लागतील, असे मत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.
रामराजेंना पाठवलेल्या समन्सबाबत विचारले असता मंत्री गोरे म्हणाले, मलाही माध्यमांमधूनच याची माहिती मिळाली. तो तपासाचा भाग आहे. मुख्यमंत्रीही बारकाईने तपासावर लक्ष ठेवून आहेत. आपण जबाबदार पदावर काम करत असताना अशा गोष्टींमध्ये बोलणे योग्य नाही. परंतु, पोलीस ज्यांना ज्यांना तपासाला बोलावतील, त्यांना उत्तरे द्यावी लागतील. तपासाला बोलावले म्हणजे काही मोठी गोष्ट नाही. मलाही पोलीस वारंवार तुम्ही एक कोटी रुपये कुठून आणले, हे विचारतात. त्याला मी उत्तर दिले. आता ज्यांना नोटीसी आल्या आहेत, त्यांनी त्याची उत्तरे द्यावीत.
महाबळेश्वर महापर्यटन महोत्सवाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार नितीन पाटील, आमदार दीपक पाटील यांनी पाठ फिरवली? यावर बोलतांना ते म्हणाले, हा पर्यटन विभागाचा कार्यक्रम आहे. आपल्या नियोजित कामांमुळे काहीजण येऊ शकले नसतील. उद्या मुख्यमंत्री त्याठिकाणी आहेत. आम्ही सगळे कार्यक्रमाला असणार आहोत. सगळे तिथे उपस्थित राहतील. याचा कोणी चुकीचा अर्थ काढू नये. महायुती मजबूत आहे, प्रत्येकाच्या घरात छोटी-मोठी भांडणे होत असतात, त्यात काही वेगळे नाही.
जिल्ह्यात ग्रामविकासामध्ये कमी काम झाले आहे? या प्रश्नावर ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसांचा आदर्शवत कार्यक्रम राबवला. प्रत्येक विभाग, मंत्र्यांना शंभर दिवसांची उद्दिष्टे ठरवून दिले. त्या उद्दिष्टपूर्तीची दिशेने आपण चांगले काम केले. याचा आढावाही ते घेत असतात. त्यांच्या पाठपुरावामुळे शंभर दिवसांत महाराष्ट्र खूप वेगाने पुढे गेला आहे. यामध्ये काम करताना काही गोष्टी कमी जास्त झाल्या असतील. मंत्री, विभागांकडून कसे काम करून घ्यायचे, हे देवेंद्र फडणवीस यांनी या माध्यमातून दाखवून दिले आहे.
कर्तत्वान जिल्हाध्यक्ष मिळेल
भारतीय जनता पार्टीचा सातारा जिल्हाध्यक्ष निवडीसंदर्भात स्थानिक पातळीवरून मी, अतुलबाबा व अन्य जणांकडून बंद पाकीटातून निरीक्षकांनी याची माहिती घेतली आहे. लवकरच प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्र्यांकडे ते सादर करतील. यावर ते योग्य निर्णय घेतील. त्यामुळे जिल्ह्याला खूप चांगला आणि कर्तत्वान जिल्हाध्यक्ष मिळेल, असा विश्वास मंत्री गोरे यांनी या प्रश्नावर बोलताना व्यक्त केला.
वारकरी सेवाभवनची निर्मिती
आषाढी वारीच्या नियोजनाची आढावा बैठकी घेतली आहे. हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव आहे. लाखो भाविक पायी चालत येतात. त्यांच्या सोयी-सुविधांबाबत वेगळे काय करता येईल, यादृष्टीने चर्चा सुरू आहे. गतुवर्षीच्या उणिवा भरून काढल्या जातील. पायी चालणार्या वारकर्यांसाठी वारकरी सेवा भवन उभारण्याबाबत चर्चा सुरू आहे. त्यामध्ये दुखापतग्रस्त वारकर्यांवर उपचार व त्यांच्या पायांना मसाज करणे आदी सुविधा देण्यात येतील. याबाबत अतुलबाबांना जास्त माहिती आहे. त्यांनी पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीवर काम केले आहे. प्रयागराजच्या धर्तीवर काय सुविधा देता येतील, याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी संगितले.
जलजीवनच्या कामांचे नियोजन नाही
राज्यात जलजीवनच्या कामांचे व्यवस्थित नियोजन झाले नाही, याची मंत्रिमंडळात चर्चा झाली आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या आहेत. तत्कालीन अधिकार्यांनी त्यांच्या सोयीनुसार इस्टिमेट केले. त्याचा अभ्यास न केल्याने अनेक गावांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यासाठी नव्याने काही सुधारित योजना व त्यासाठीच्या निधीची तरतूद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न आहेत.