
आम्ही तुमच्या जमिनीचे घोटाळे उघडकीस आणले तर...; जयकुमार गोरेंचा पवारांना इशारा
अकलूज : नगरपरिषदेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेताना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रोहित पवारांना जोरात टोला लगावला आहे. फडणवीस यांचे सरकार आल्यापासून जमिनीचे घोटाळे वाढले आहेत, असं रोहीत पवार म्हणाले होते. याबबत मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. पवारांना सांगा, झाकली मूठ सव्वा लाखाची आहे. जर आम्ही तुमच्या जमिनीचे घोटाळे उघडकीस आणले तर ते घोटाळे तुम्हाला कुठे नेऊन ठेवतील हे कळणार नाही, असा इशारा गोरे यांनी रोहीत पवारांना दिला आहे.
अकलूज येथील भाजपा कार्यालयात अकलूज नगरपरिषदेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यावेळी मंत्री गोरे यांनी आमदार पवार यांच्यावर निशाणा साधला. यावेळी माजी आमदार राम सातपुते, अकलुज भाजप मंडलचे अध्यक्ष सुजयसिह माने पाटील, शहर अध्यक्ष महादेव कावळे उपस्थित होते.
मंत्री गोरे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात भाजपाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. येत्या निवडणूकांमध्ये भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येणार आहे. सध्या आम्ही महायुती म्हणून निवडणूकांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. मित्र पक्षाना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु काही ठिकाणी युती झाली नाही तर आम्ही स्वबळावर लढणार आहोत.
आमदार जानकर आमच्या मंत्र्यांना भेटतात
अकलूज मधील लोकांना येथे परिवर्तन घडवायचे आहे. आम्ही अकलूजला भयमुक्त करून एक विकासाभिमुख नेतृत्व देण्याचा प्रयत्न करू. आमदार उत्तमराव जानकर यांच्याविषयी बोलताना गोरे म्हणाले, जानकर दिवसा आमच्यावर टीका करतात आणी रात्री आमच्याच मंत्र्यांना जाऊन भेटतात. बच्चू कडू यांच्या आंदोलनाविषयी बोलताना गोरे म्हणाले, गाड्या फोडणे, टायर जाळणे, प्रक्षाेभक विधाने करणे कडू यांनी टाळले पाहिजे. त्यांनी संयम ठेऊन आपली मागणी, भूमिका शांतपणे सरकार समोर मांडावी. त्यातून योग्य तोडगा निघेल, असे मंत्री गाेरे म्हणाले.