"मराठी भाषेचा अवमान करणारे..."; नरेंद्र मेहतांसमोरच अविनाश जाधव कडाडले, 'मराठी-हिंदी' पुन्हा एकदा ऐरणीवर
मीरा भायंदरमधील मराठी-हिंदी वादामुळे मनसे नेते अविनाश जाधव आणि भाजप नरेंद्र मेहता याच्यात वाद निर्माण झाला. पोलिसांनी मनसेला मोर्चाची परवानगी दिली नाही यामुळे मीरा भायंदरमध्ये तणावाचे वातावरण निम्हण झाले होते. तसेच, मनसे नेते अविनाश जाधव यांना सुद्धा पहाटेच्या सुमारास अटक करण्यात आली होती. यासोबतच भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचे मराठी विरोधी विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे राजकीय वातावरण ‘मराठी-हिंदी’ वरून तापले होते.
अशातच, आता मीरा-भाईंदर शहरात मनसे जिल्हाध्यक्ष संदीप राणे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात राजकीय नाट्य शिखरावर पोहोचले. या कार्यक्रमात मनसे नेते अविनाश जाधव यांनी थेट भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर टीकेची झोड उठवत, मराठी भाषा विरोधी मानसिकतेवर घणाघात केला.
सदर कार्यक्रमात अविनाश जाधव यांनी काँग्रेस नेते मुजफ्फर हुसेन यांचे खुले कौतुक करत म्हटले की, “या महाराष्ट्रात जन्म घेणारा प्रत्येक हिंदी भाषिक जर मराठी भाषेचा सन्मान करेल, तर तो मुजफ्फर हुसेनसारखा आदर्श व्यक्तिमत्व होईल. अशा व्यक्तींचे आम्ही मनापासून स्वागत करतो.”
मात्र, याच वेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांना लक्ष करत म्हटले, “मराठी भाषेचा अवमान करणारे, निवडणुकीपुरती मराठी माणसाची भाषा करणारे आणि नंतर त्याच मराठी समाजाकडे दुर्लक्ष करणारे लोक धोकादायक आहेत. अशा लोकांपासून सावध राहा.”
या भाषणावेळी भाजप आमदार नरेंद्र मेहता स्वतः कार्यक्रमस्थळी उपस्थित होते, त्यामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले. मेहतांनी यापूर्वी मराठी-विरोधी वक्तव्य केल्याचा आरोप मनसेने वारंवार केला आहे.
या कार्यक्रमात एकीकडे वाढदिवसाचा उत्साह असताना, दुसरीकडे मराठी-हिंदी भाषिक वादाची ठिणगी पुन्हा एकदा प्रज्वलित झाल्याचे चित्र होते. मेहतांच्या भाषणानंतर अविनाश जाधव यांनी आपल्या विशिष्ट शैलीत भाषणाचा शेवट करत एकप्रकारे भाजपला अप्रत्यक्ष इशारा दिला.
मीरा-भाईंदरच्या राजकारणात हा वाद नवीन नाही, मात्र एका सार्वजनिक मंचावर अशा प्रकारे विरोधकांवर थेट प्रहार केल्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विषय पुन्हा तापण्याची शक्यता आहे.