
गद्दारी करणाऱ्यांना त्यांच्याच प्रभागात जागा दाखवू; आमदार जयंत पाटलांचा इशारा
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, शिवसेना (उबाठा) गटाच्या ३५० हून अधिक इच्छुकांच्या मुलाखती आमराई क्लब येथे पार पडल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे नेते आमदार विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील यांच्यासह डॉ. जितेश कदम, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, समिती प्रमुख मंगेश चव्हाण, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, निरिक्षक शेखर माने, युवकचे अध्यक्ष राहुल पवार आदी उपस्थित होते. मुलाखतीनंतर जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
जयंत पाटील म्हणाले, गेल्या निवडणुकीत भाजपला नागरिकांनी सत्ता दिली. पण त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. शहर रामभरोसे आहे. शहरातील गुन्हेगारी, नशेखोरी व महिलांची सुरक्षितता याबाबत नागरिक भयभीत आहेत. महापालिका क्षेत्र सुरक्षित ठेवावे यासाठी नागरिक रस्त्यावर उतरून पोस्टर लावत सुरक्षिततेसाठी आवाहन करीत आहेत. अशा वेळेला परिस्थितीमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी लोकांच्या मागणीचा, पोस्टरचा वापर राजकारणासाठी केला जाईल या भीतीने पोलीस गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे हुकूमशाहीचे मार्ग आहेत, अशा पद्धतीने दडपशाही सांगलीची जनता कधीही मान्य करणार नाही, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला आहे.
महाविकास आघाडीच देईल सुरक्षित शहर
शहरात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर शहर सुरक्षिततेवर भर दिला जाईल. प्रत्येक चौका-चौकात सीसीटीव्ही बसविला जाईल. जनतेच्या सहकार्याने ड्रग्ज विक्रीचा बंदोबस्त केला जाईल. पोलिसांनी हे करणे आवश्यक आहे. पण त्यांच्याकडून दडपशाही सुरू आहे. पण आम्ही अशी ठिकाणे उखडून टाकू, अशी ग्वाही आमदार जयंत पाटील यांनी दिली.