
पाण्यापासून कोणी वंचित राहणार नाही! जलसंपदा विभागातील आढावा बैठकीत आमदार खताळांचा विश्वास
घुलेवाडी येथील निळवंडे कालवा विभागाच्या कार्यालयात आमदार खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, तालुकाध्यक्ष रामभाऊ रहाणे, राजेंद्र सोनवणे, भाजप तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, अभियंता सेलचे जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र चकोर, अमित नवले यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी व अभियंते उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले की, निळवंडे, भोजापूर व आढळा परिसरातील काही गावे यापूर्वी निळवंडे कालवा योजनेतून वगळण्यात आली होती. मात्र जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही कालव्यांतून तीन टीएमसीपर्यंत पाणी उपलब्ध होत आहे.
मतदारसंघातील शेतकरी आणि नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर पाण्याची मागणी होत असून, त्यानुसार नियोजन सुरू आहे. निवडणुकीनंतर या कामांना वेग मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
महायुती सरकार शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असे आ. खताळ यांनी नमूद केले.
या बैठकीत शेतकरी व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी विविध सूचना मांडल्या. त्यांची नोंद घेण्यात आली असून, जलसंपदा विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून योग्य निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
निळवंडेच्या दोन्ही कालव्यांतून मालदाड, ७७ सत्यखिडी, मेढवण, वेल्हाळ, कन्हें वदनापुरी, हिवरगाव पावसा, सावरगाव, डिग्रस, कोळवाडे, मालुजे, शिरापूर, चिंचोली गुरव आदी गावांच्या सर्वेक्षणाचे निर्देश जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यापूर्वीच दिले होते. हे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, लवकरच त्यांच्या हस्ते या कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
तसेच निमगाव पागा आणि सावरचोळ परिसराच्या सर्वेक्षणाचेही निर्देश देण्यात आले असून, प्रत्यक्ष पाणीपुरवठ्याचे काम सुरू केले जाईल, अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.