MLA of Mira Bhayander Assembly Constituency Geeta Jain is upset with the mahayuti
मिरा भाईंदर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण रंगले आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत आता संपली आहे. 288 जागांसाठी राज्यामध्ये निवडणूका होणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी 7995उमेदवारांनी 10,905 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 2019 साली झालेल्या निवडणुकीमध्ये पाच हजारांपेक्षा अधिक अर्ज होते. यंदा त्यापेक्षा दुप्पट अर्ज दाखल झाले आहेत. आता मिरा भाईंदर मतदारसंघातील विद्यमान महिला आमदारांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
महायुती म्हणून पहिल्यांदाच भाजप, शिंदे गट व अजित पवार गट हे निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे जागावाटपामध्ये काही स्थानिक नेते नाराज झाले आहेत. आता मिरा भाईंदरमध्ये देखील असेच नाराजी नाट्य पसरले आहे. मिरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांना महायुतीकडून उमेदवार मिळण्याची शक्यता होती. अखेर पर्यंत त्यांच्या नावाची चर्चा होती. शिंदे गटाकडून त्यांनी यासाठी प्रयत्न देखील केले होते. मात्र मिरा भाईंदर मतदारसंघ जागावाटपामध्ये भाजपला मिळाला. भाजपकडून माजी आमदार नरेंद्र मेहता यांना तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे गीता जैन यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
हे देखील वाचा : 288 जागांवर 7995 उमेदवार रिंगणात, महायुती-मविआमध्ये किती जागांवर कोण लढणार?
गीता जैन यांनी महायुतीने तिकीट नाकारल्यानंतर आपली खंत व्यक्त केली. ते म्हणाले की, “दिल्लीपासून प्रदेश पातळीपर्यंत माझ्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. मी पक्षासाठी गुवाहाटीपर्यंत गेले होते. पण तरी पक्षाने माझे तिकीट कापले. पक्षाने माझे तिकीट नाकारले, याची मला कल्पना नाही. कारण अनेकजण म्हणतात की, तिकीट विकत घेतले. एका दिवसापूर्वीपर्यंत मला आश्वासन देऊनही तिकीट नाकारण्याचे कारण अद्याप समजलेले नाही. ज्या उमेदवाराची प्रतिमा स्वच्छ नाही. ज्याच्यावर इतके गुन्हे दाखल झालेले आहेत. तसेच ज्याचा भ्रष्टाचार सिद्ध झाला आहे, अशा उमेदवाराला जर तिकीट दिले तर पक्षाची कोणती प्रतिमा तुम्ही जनतेसमोर घेऊन जात आहात?” असा सवाल गीता जैन यांनी उपस्थित केला आहे.
गीता जैन पुढे म्हणाल्या की, “देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यांची काही अडचण होती, त्यामुळे पक्ष मला तिकीट देऊ शकला नाही. पण माझी निवडणूक ही जनतेची निवडणूक आहे. मीरा रोडमधील रिक्षावाले, बिल्डर, गृहिणी, युवा आणि विद्यार्थ्यांना आपल्या भवितव्याची चिंता असेल तर त्यांनी विचार करून मतदान करावे,” असे मत गीता जैन यांनी व्यक्त केले आहे.