File Photo : Ram Satpute
अकलूज : रणजितसिंह मोहिते-पाटील हे भाजपकडून विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यामुळे ते या निवडणुकीमध्ये आमच्यासोबत असतील. आमच्या प्रचारात सहभागी होणार असल्याचे राम सातपुते यांनी पत्रकारांना सांगितले. भाजपकडून माळशिरस तालुका विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करताना राम सातपुते अकलूज येथे पत्रकारांशी बोलत होते. रॅली काढून, मोठे शक्तिप्रदर्शन करत सातपुते अर्ज भरण्यासाठी अकलूज येथील प्रांत कार्यालयात आले होते.
हेदेखील वाचा : सोलापूर दक्षिणमध्ये काँग्रेसचे दिलीप मानेंची सिंहगर्जना; महाविकास आघाडीत पेच निर्माण
सातपुते म्हणाले, एका सामान्य घरातील कार्यकर्त्यांना आमदारकीची पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल मी भारतीय जनता पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेते मंडळींचे आभार मानतो. सामान्य कार्यकर्त्यांना असामान्य संधी देणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. मी तालुक्यात पुन्हा एकदा मताचे दान मागणार आहे आणि माझे यापूर्वी आमदार असताना केलेले काम पाहून येथील जनता मला पुन्हा मतरूपी आशिर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. मागील पाच वर्षात मी या तालुक्यात ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे.
तसेच माळशिरस तालुक्यातील सर्व लाडक्या बहिणी मला निश्चितच मतदान करतील. कारण, ज्यांनी ही योजना आणली त्याच पक्षाकडून मी निवडणुक लढत आहे. ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. आज जे चित्र दिसत आहे ते येत्या 23 तारखेला तुम्हाला दिसणार नाही. भारतीय जनता पार्टीचे काम बोलते. त्यांनी आणलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे जनता भाजपला आणि त्यांच्या उमेदवाराला म्हणजे मला नाराज करणार नाही.
माजी जिल्हा निबंधक व सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी प्रशासक असणाऱ्या शैलेश कोतमिरे यांनी कार्यकर्त्यांची मोठी फौज घेऊन अपक्ष अर्ज भरला. कोतमिरे हे खाटिक समाजाचे आहेत आणि उत्तम जानकरांनी खाटिक समाजाचे असल्याचा दाखला काढला आहे.
आता खाटिक समाजाचे लोक उत्तम जानकर यांना मत देतील की शैलेश कोतमिरे यांना मत देतील हे पाहण्यासारखे ठरेल. शैलेश कोतमिरेंची उमेदवारी जानकरांची मते खाण्यासाठीच असल्याने फार मोठी चाल खेळली गेल्याची चर्चा मात्र संपूर्ण तालुक्यात सुरू आहे.
हेदेखील वाचा : Shreenivas Vanaga: अखेर 36 तासांननंतर श्रीनिवास वनगा घरी परतले पण…